Sachin Tendulkarच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमचा जोरदार जल्लोष

Sachin Tendulkarच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमचा जोरदार जल्लोष

Tendlya film team: क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा पन्नासावा वाढदिवस (Sachin Tendulkar 50th birthday) साजरा करीत असताना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील औंढी या गावी (Aundhi village) सचिन जाधव दिग्दर्शित ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या (Tendlya film) टीमने एकत्रित येत आज येथे मोठा जल्लोष केला आहे. क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी या ठिकाणी जागतिक क्रिकेट दिन (World Cricket Day) म्हणून यापुढे २४ एप्रिल मानला जाईल अशी घोषणाच करून टाकली. गावातून पालखीसह सवाद्य मिरवणूक काढून तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.

सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अखंड औंढी गावात सणाचे वातावरण होते. प्रत्येक घराच्या चौकटीत गुढी उभारण्यात आली होती, रांगोळी काढण्यात आली होती. गुढीवर बॅट लावल्या होत्या. त्यावर ‘तेंडल्या’चे स्टिकर होते. गावाच्या एका टोकावरील हनुमान मंदिरापासून प्रत्यक्ष मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखीत सचिन तेंडुलकर यांचा अर्धपुतळा होता. गावातील महिलांचे लेझीमपथक होते.

हलगी आणि तुतारीच्या निनादात दिंडी सुरू झाली. रस्त्यावरून मिरवणुकीच्या दरम्यान पालखीवर फुलांची उधळण करण्यात येत होती. जागोजागी अंगणात महिला औक्षण करत होत्या. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत पालखीचा समारोप झाला. या ठिकाणी सचिन तेंडुलकर यांच्या मोठ्या बॅनरचे अनावरण करण्यात आले. सचिनचे आवडते खाद्य वडापाव असल्याने या ठिकाणी त्याने आतापर्यंत मारले शंभर शतकांची दखल घेत शंभर वडापावचा नैवेद्य दाखवण्यात आला.

सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

तिरंगी रंगात रंगलेल्या चिमुकल्या शाळकरी पोरांनी तेंडल्याचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. ज्येष्ठ क्रिडा पत्रकार सुनंदन लेले यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व सांगत यापुढे अधिकृत कुणी घोषणा करो अथवा न करो, आम्ही मात्र जागतिक क्रिकेट दिन म्हणून आजचा दिवस घोषित करत असल्याचे लेले यांनी जाहीर केले. गावातील ग्रामस्थांमध्ये अपूर्व उत्साह संचारला होता. लहान मुलांपासून वृद्ध पुरुष महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

तेंडल्या चित्रपट एक राष्ट्रीय आणि पाच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित आहे. ‘तेंडल्या’ चा दिग्दर्शक सचिन जाधवचे बालपण या औंढी गावात गेले. सिनेमातील अनेक घटना या गावात घडलेल्या असल्याने सचिन तेंडुलकरच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्यासाठी या गावाची निवड करण्यात आली होती. एकूणच ‘तेंडल्या’च्या निर्मितीप्रक्रियेत या संपूर्ण गावाचे योगदान मोठे असल्याची भावना सचिन जाधवची आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube