गुजरात पाकिस्तान अन् बांगलादेशाचा भाग आहे का? ज्येष्ठ अभिनेते परेश रावल इतके का संतापले?

National Film Award : यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात होणार आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 11T213057.386

National Film Award 2026 : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या 72 वर्षांच्या ( Film Award) इतिहासात प्रथमच पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर आयोजित केला जात असल्याने वादाला तोंड फुटलं आहे. यंदाचा 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतला असतानाच आता ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना परेश रावल यांनी पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित करण्याला विरोध करण्याचं कारणच काय, असा सवाल केला. गुजरात भारताचाच अविभाज्य भाग आहे, मग राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा कार्यक्रम तिथं घेण्यात गैर काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय स्तरावरील सोहळे केवळ दिल्लीपुरते मर्यादित न ठेवता देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आयोजित केले पाहिजेत, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

गुजरातपलीकडचा देश फक्त निवडणुका आल्यावरच आठवतो का? राज ठाकरे मोदी सरकारवर भडकले

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची दिल्लीतील 70 वर्षांहून अधिक काळाची परंपरा मोडण्याची गरज काय होती, असा सवाल त्यांनी केला. भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी करणारे दादासाहेब फाळके महाराष्ट्रातील असताना पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्राचा विचार का झाला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रासोबतच तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्मिती होते. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी गुजरातचीच निवड का करण्यात आली, याचं कारण केंद्र सरकारने स्पष्ट करावं, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. एकीकडे राज ठाकरे यांच्यासह काही नेत्यांकडून निर्णयाला विरोध होत असताना परेश रावल यांच्या समर्थनामुळे हा वाद आता राजकारणासोबतच सिनेइंडस्ट्रीतही चर्चेचा विषय ठरला आहे.

follow us