‘बिकीनी किलर’ चार्ल्स शोभराजची 19 वर्षांनी सुटका

‘बिकीनी किलर’ चार्ल्स शोभराजची 19 वर्षांनी सुटका

काठमांडू : 70 आणि 80 च्या दशकातील सीरिअल किलर चार्ल्स शोभराज अखेर तुरुंगाबाहेर आला आहे. 19 वर्षांपासून तो नेपाळच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्याला त्याचा देश फ्रान्सला पाठवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.

चार्ल्स शोभराजची आज नेपाळच्या काठमांडू सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे, दोन अमेरिकन पर्यटकांच्या हत्येप्रकरणी शोभराजला 2003 पासून नेपाळच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

चार्ल्स शोभराजची पत्नी निहिता बिस्वास यांनी सांगितलं की, आज संध्याकाळीच चार्ल्सला फ्रान्समध्ये त्याच्या कुटुंबाकडे पाठवण्याचा प्रयत्न करतेय. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर काही समस्या उद्भवल्यामुळे चार्ल्सची आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

चार्ल्स शोभराज खून, चोरी आणि फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सामील आहे आणि भारत, ग्रीससह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्याचा हात आहे. मात्र, नेपाळ भेटीदरम्यान दोन परदेशी पर्यटकांच्या हत्येप्रकरणी चार्ल्सला 2003 मध्ये अटक करण्यात आली. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नेपाळमध्ये जन्मठेपेच्या शिक्षेच्या अंतर्गत 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

चार्ल्स शोभराजला ‘बिकिनी किलर’ आणि ‘द सर्पंट’ म्हणून ओळखलं जात होतं. शोभराजवर 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. शोभराज हा केवळ नेपाळचाच गुन्हेगार नव्हता, तर भारत, थायलंड, तुर्कस्तान आणि इराणमध्येही तो आरोपी होता. शोभराजला 1976 मध्ये भारतात अटक करण्यात आली होती. पण 1986 मध्ये तो तिहार तुरुंगातून फरार झाला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube