इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून वादग्रस्त कार्यकाळ! वाचा, कोण होते कट्टर धर्मगुरू इब्राहिम रईसी

इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून वादग्रस्त कार्यकाळ! वाचा, कोण होते कट्टर धर्मगुरू इब्राहिम रईसी

Iranian President Ebrahim Raisi : हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने घडलेल्या अपघातात इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं निधन झालं आहे. या घटनेमुळे जगभर खळबळउडाली आहे. तसंच, रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघातच झाला की हा घातपात आहे? याबद्दलही उलट-सुलट चर्चा केली जात आहे. (Ebrahim Raisi ) इब्राहिम रईसी यांनी अनेक देशांना मदत केली होती. कोण होते रईसी? पाहूया…

 

मोठी बातमी : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

कोण आहेत इब्राहिम रईसी?

कट्टर पंथीय असलेले धर्मगुरू रायसी यांचा जन्म 1960 मध्ये पूर्वेकडील मशहद शहरात एका धार्मिक कुटुंबात झाला होता. खरं तर हा प्रदेश इराणच्या 1979 च्या इस्लामिक क्रांतीने प्रभावित झालेला होता. या शहरात शिया मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र मानली जाणारी मशीद देखील आहे. रईसी यांचे वडील मौलवी होते. रायसी केवळ पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी कौम शहरातील शिया संस्थेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थीदशेत त्यांनी मोहम्मद रझा शाह यांच्या विरोधात पाश्चात्य देशांनी पाठिंबा दिलेल्या निदर्शनांमध्ये भाग घेतला. पुढे अयातुल्ला रुहोल्लाह खोमेनी यांनी 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीद्वारे शाह यांना सत्तेवरून हटवलं.

 

देशाचे सर्वोच्च धार्मिक नेते

इब्राहिम यांची वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तेहरानजवळील काराजचे अभियोजक(Prosecutor) जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. रईसी 1989 ते 1994 दरम्यान तेहरानचे अभियोजक(Prosecutor) जनरल होते. त्यानंतर २००४ पासून पुढील दशकासाठी न्यायिक प्राधिकरणाचं उपप्रमुख होते. २०१४ मध्ये ते इराणचे प्रॉसिक्युटर जनरल झाले. इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख असलेल्या रईसी यांचे राजकीय विचार ‘अत्यंत कट्टरपंथी’ मानले जातात. ते इराणचे कट्टरतावादी नेते आणि देशाचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे उत्तराधिकारी मालने जात होते.

 

इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष म्हणून निवड

न्यायपालिकेचे प्रमुख असताना त्यांनी राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन अनेक आरोपींना फाशी आणि अन्यायकारक तुरुंगवास दिल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला होता. जून 2021 मध्ये उदारमतवादी हसन रुहानी यांच्या जागी ते इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 2019 मध्ये ते इराणचे अध्यक्ष होण्यापूर्वी अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अली होसेनी खोमेनी यांची राजकीय नियुक्ती केल्याबद्दल रायसी यांच्यावर निर्बंध लादले.

 

 

राष्ट्राध्यक्ष म्हणून वादग्रस्त कार्यकाळ

६३ वर्षीय रायसी २०२१ मध्ये इराणचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात इराणने सर्वात मोठे सरकारविरोधी निषेध आणि गंभीर आर्थिक मंदी अनुभवली आहे. त्यांच्या कार्यकाळात इराण आणि इस्रायलमधील तणावही उच्चांकावर पोहोचला होता. २०२१ च्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी तुलनेने कमी ताकदवान नेते, त्यांचे पूर्ववर्ती हसन रुहानी यांचा पराभव केला. या निकालाने निर्णायक राजकीय शक्ती आणि नेतृत्व पुन्हा कट्टरपंथीयांच्या हाती गेलं. रईसी यांना वेगळं बनवणारी गोष्ट म्हणजे रुहानी यांच्या सरकारने युनायटेड स्टेट्ससह जागतिक शक्तींबरोबर २०१५ च्या अणु करारावर स्वाक्षरी केली असताना रईसी यांनी पाश्चिमात्य आणि विशेषत: अमेरिकेशी केलेल्या या कराराचा निषेध केला होता. तसंच, मोठ्या महामारी, अशांतता, आर्थिक निर्बंध आणि सरकारविरोधी निदर्शने यांचा सामना करणाऱ्या देशाचा वारसाही रायसी यांना मिळाला. जेव्हा एका २२ वर्षीय इराणी महिलेचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला, तेव्हा काही गोष्टी समोर आल्या.

 

बातमीचा आनंद साजरा

सप्टेंबर २०२२ मध्ये महसा अमिनीच्या मृत्यूमुळे अनेक इराणी महिलांनी देशाच्या कठोर हिजाब कायद्याच्या विरोधात उभं राहून देशव्यापी निषेध नोंदवला होता. 1979 मध्ये सरकार स्थापन झाल्यापासून इराणी राजवटीसमोरील सर्वात गंभीर आव्हान म्हणून हिजाबविरोधी निदर्शने करण्यात आली होती. महिला आणि तरुणांच्या नेतृत्वाखाली हजारो इराणी लोक दडपशाही विरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. ‘स्त्री, जीवन, स्वातंत्र्य”च्या घोषणांनी संपूर्ण जगाला वेठीस धरून निदर्शनांनी आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतलं. दुसरीकडे रायसी सरकारने शक्य तितक्या भीषण मार्गाने उठाव चिरडण्याचा प्रयत्न केला. इराणी सुरक्षा दलांनी शेकडो विरोधकांना केवळ निर्दयीपणे फक्त ठार केलेच नाही, तर अनेकांना अटकही केली. एवढेच नाही तर देशाची न्यायव्यवस्था अजूनही आंदोलनात सहभागी झालेल्यांना फाशीचे आदेश जारी करीत आहे. तसंच, हेलिकॉप्टर अपघाताच्या बातम्या आल्यानंतर अनेक इराणी विरोधकांनी या बातमीचा आनंद साजरा केल्याचं समोर आलं आहे.

 

इस्रायली हवाई हल्ल्याचा बदला

रईसी यांच्या कार्यकाळात इराणचे इस्रायलशी आधीच असलेले संघर्षपूर्ण संबंध अत्यंत रसातळाला गेले. इस्त्रायल-हमास युद्धाने आगीत आणखी भर टाकली आणि इराणचा पाठिंबा असलेल्या अनेक दहशतवादी गटांनी हमाससह इस्रायलवर हल्ले सुरू केले. इराणने ३०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागून ज्यू राष्ट्रावर पहिला थेट लष्करी हल्ला केल्यावर एप्रिलमध्ये दोन मध्य-पूर्व राष्ट्रांमधील तणाव वाढला. इराणी अधिकाऱ्यांनी हा हल्ला दमास्कसमधील देशाच्या दूतावासावर कथित इस्रायली हवाई हल्ल्याचा बदला म्हणून केला होता, ज्यात इराणी कमांडर मारले गेले होते.

 

मोठी बातमी! इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसींचा हेलिकॉप्टर अपघात मृत्यू, इराणला मोठा धक्का

तर पुढे काय होणार?

बचाव पथकं अद्याप बेपत्ता इराणच्या अध्यक्षाचा शोध घेत असताना अनेकांचा अशी भीती आहे की, या प्राणघातक अपघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा. रईसी मृत्युमुखी पडल्यानंतर इराणचे काय होणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. इस्लामिक रिपब्लिकच्या घटनेच्या कलम १३१ नुसार, जर एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा पदावर असताना मृत्यू झाला, तर प्रथम उपाध्यक्ष पदभार स्वीकारतात. देशाच्या सर्वोच्च नेत्याचे या प्रकरणावर अंतिम मत असते. डॉ. मोहम्मद मोख्बर हे सध्या इराणचे उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. काळजीवाहू म्हणून उपाध्यक्ष राष्ट्राध्यक्षाचा पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर पहिल्यांदा उपाध्यक्ष, संसदेचे स्पीकर आणि न्यायपालिकेचे प्रमुख यांचा समावेश असलेली परिषद जास्तीत जास्त ५० दिवसांच्या आत नवीन राष्ट्राध्यक्षासाठी निवडणुकीची व्यवस्था करण्यास बांधील असते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज