Pakistan : अखेर तिढा सुटला! पाकिस्तानात ‘पीपीपी’-‘पीएमएल-एन’चे सरकार; शहबाज शरीफ होणार PM
Pakistan New Government Formation : पाकिस्तानात नवीन सरकार स्थापन करण्याचा (Pakistan) तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाकिस्तान पीपुल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) यांच्यातील चर्चा यशस्वी ठरल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेत पक्षाच्या नेत्यांनी याबाबत घोषणा केली. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी (Bilawal Bhutto) यांनी सांगितले की शहबाज शरीफ (shehbaz sharif) पुन्हा पंतप्रधान बनतील आणि पीपीपीचे सहअध्यक्ष असिफ जरदारी राष्ट्रपती असतील.
पाकिस्तानातील जियो न्यूजने भुट्टोंच्या हवाल्याने माहिती दिली आहे की पीपीपी आणि पीएमएल-एन या दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळवले आहे. देशात चांगले सरकार स्थापन करण्याचा दोन्ही पक्षांचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाकिस्तानातील निवडणुकीत (Pakistan Elections) अपक्ष उमेदवारांनी जवळपास 93 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये बहुतांश उमेदवार माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने पुरस्कृत केलेले आहेत. पीएमएल-एनने 75 आणि पीपीपीने 54 जागा जिंकल्या आहेत. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान या पक्षाच्या 17 विजयी उमेदवारांनी या आगामी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Pakistan Election : पाकिस्तानच्या निवडणुकीत मोठ्ठा घोटाळा! ‘त्या’ आरोपांची होणार चौकशी
तुरुंगात असलेल्या इम्रान खान (Imran Khan) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या पक्षाबरोबर निवडणुकीत फसवणूक झाली आहे. चोरलेला जनादेश परत केला गेला पाहिजे अशी मागणी खान यांनी केली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इम्रान खान मागील वर्षभरापासून तुरुंगात आहेत.
निवडणुकीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप
दरम्यान, याआधी रावळपिंडीचे माजी आयुक्त लियाकत चठ्ठा यांनी शहरातील निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांना विजयी केले गेले असा आरोप केला होता. रावळपिंडीत 13 उमेदवारांना जबरदस्तीने विजयी घोषित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाने 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी आणि पक्षाला दिलेला जनादेश हिसकावून घेण्याच्या विरोधात देशव्यापी निदर्शने सुरू केली असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
निवडणूक आयोगाने या आरोपांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. रावळपिंडीचे नवनियुक्त आयुक्त सैफ अन्वर जप्पा यांनी मात्र निवडणुकीतील अनियमिततेचे आरोप फेटाळून लावले.