पार्किंग फाइन अन् हाय स्पीड चलन.. किरकोळ चुकांमुळे विद्यार्थ्यांचा व्हिसाच रद्द; अमेरिकेत चाललंय काय?

पार्किंग फाइन अन् हाय स्पीड चलन.. किरकोळ चुकांमुळे विद्यार्थ्यांचा व्हिसाच रद्द; अमेरिकेत चाललंय काय?

US Visa Cancelled : अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनच्या (AILA) नव्या रिपोर्टमध्ये अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा रद्दच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटा बसला आहे. हा रिपोर्ट 17 एप्रिल रोजी जारी करण्यात आला होता. यानुसार 327 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत ज्यात व्हिसा रद्द करण्यात आला आहे किंवा विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड बंद करण्यात आले आहेत.

विद्यार्थी, वकील आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ही आकडेवारी देण्यात आली आहे. यामध्ये 50 टक्के भारतीय विद्यार्थी आहेत. तर 14 टक्के चीनी विद्यार्थी आहेत. याशिवाय दक्षिण कोरिया, नेपाळ आणि बांग्लादेशातील विद्यार्थ्यांनाही फटका बसला आहे. या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं असा सवाल विचारला जात आहे.

व्हिसा रद्द झाल्यामुळे ओपीटीवर (ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग) असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास झाला आहे. SEVIS रेकॉर्ड बंद झाल्यामुळे ते काम सुरू ठेऊ शकत नाहीत. जे विद्यार्थी अजूनही शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती थोडी सोपी आहे. पण पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अडचणी वाढल्या आहेत.

चीनची डोकेदुखी वाढणार! चीनी जहाजांवर तीन वर्षांसाठी नवा टॅक्स; ट्रम्प सरकारची घोषणा

व्हिसा रद्दची कारणेही किरकोळ

आता व्हिसा रद्द करण्याची कारणं ऐकली तर आश्चर्यच वाटेल. पार्किंग दंड, गाडी वेगात चालवणे अशा किरकोळ चुकांची शिक्षा म्हणून थेट व्हिसाच रद्द केले आहेत. यातील बहुतांश प्रकरणात विद्यार्थ्यांविरुद्ध कोणतेही आरोप दाखल करण्यात आलेले नाहीत किंवा प्रकरणे बंद केली आहेत. तरीदेखील विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. म्हणजेच या विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता का असा संशय व्यक्त केला जात आहे.

अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सर्वाधिक

अमेरिकेत शिक्षणाच्या चांगल्या सुविधा आहेत. त्यामुळे जगभरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. यात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षात 3.34 लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत होते. यापैकी साधारण 97 हजार 556 विद्यार्थी ओपीटी कार्यक्रमांतर्गत आहेत. ज्यामुळे या विद्यार्थ्यांना अमेरिकेत तात्पुरत्या स्वरुपात काम करण्याची संधी मिळते. अहवालानुसार SEVIS रेकॉर्ड बंद करणे आणि व्हिसा रद्द करण्यामागे जी कारणे देण्यात आली आहेत ती अनियमित आणि विसंगत आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कायदा आणि शैक्षणिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र संकटात सापडले आहे. याचा विचार होताना दिसत नाही.

धक्कादायक! तैवानच्या सैन्यात चीनची घुसखोरी; पोलखोल झाल्यानंतर उडाली खळबळ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube