Wagner Rebel : रशियात अंतर्गत युद्ध शिगेला; बंडखोरी करणाऱ्यांना संपण्याचे पुतिन यांचे आदेश
Russia Wagner Rebel : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीनेचं बंडाचं हत्यार उपसल्याने रशियात मोठी खळबळ माजली आहे. रशियाच्या सर्वात मोठ्या खासगी सैन्य असलेल्या वॅग्नरच्या कमांडरने पुतीन यांच्या विरोधात बंड पुकारत सत्ता उलथवून टाकण्याचा पण केला. त्यानंतर पुतिन यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, बंडखोरी सुरू करणाऱ्यांनी देशाशी विश्वासघात केला असून, बंडखोरांना संपवण्याचे आदेश पुतिन यांनी रशियन सैन्याला दिले आहेत. पुतिन यांच्या या आदेशामुळे रशियातील अंतर्गत युद्ध आता शिगेला पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
BREAKING: Putin condemns Wagner rebellion, orders armed forces to neutralize those responsible
— BNO News (@BNONews) June 24, 2023
पुढे बोलताना पुतिन म्हणाले की, वैयक्तिक स्वार्थापोटी वॅग्नर ग्रुपने पाठीत वार केले असून, रशिया आपल्या भविष्यासाठी पूर्ण ताकदीने लढत असून, विश्वासघात करणाऱ्यांविरोधात आमचे उत्तर अधिक कठोर असेल, असा इशारादेखील पुतिन यांनी दिला आहे. देशाच्या लष्कराविरोधात कोणीही शस्त्र उचलले तर त्याला शिक्षा होईल.
पिंग-पोंग बॉल, फुगे अन् बर्फाचा वापर करुनही ‘टायटॅनिक’ अद्यापही समुद्रातच, वैज्ञानिक ठरले फेल…
मी लष्कराच्या मुख्यालयात
देशात उद्भवलेल्या परिस्थितीनंतर पुतिन देशवासियांना संबोधित करत असतानाच वॅग्नर ग्रुपच्या कमांडरने मोठा दावा केला आहे. ज्यात येवगेन प्रिगोझिनने आपण रोस्तोवमधील लष्कराच्या मुख्यालयात असून, वॅग्नर सैनिकांनी रोस्तोव्ह शहराचा ताबा घेतल्याचा दावा येवगेनने एका व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.
बंड नाही, न्यायासाठी लढा
दरम्यान, या सर्व घडामोडींमध्ये वॅग्नर ग्रुपच्या कमांडरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात आपण बंड नाही, तर न्यायासाठी मैदानात उतरल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी राजधानीत दहशतवादविरोधी कारवायांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. अनेक भागात रस्त्यांवर सैन्य तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.