सिंध, बलुचिस्तान अन् गिलगिट बाल्टिस्तान..पाकिस्तानचे किती तुकडे होणार?

Pakistan News : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत (Pakistan News) खराब झाली आहे. कर्ज घेऊनच देशाचा कारभार करावा लागत आहे. देशातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी राज्यकर्त्यांची दमछाक होत आहे. भारताबरोबरील तणावाने तर पाकिस्तानच (India Pakistan Tension) कंबरडेच मोडले आहे. अशा परिस्थितीत असतानाच पाकिस्तानात विद्रोहाचे आवाज घुमू लागले आहेत. बलुचिस्तानाने तर आधीच (Balochistan) स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
नव्या सिंध देशासाठी जनतेचा विद्रोह
आता तर सिंध प्रांतातही विद्रोहाचे स्वर कठोर होऊ लागले आहेत. सिंधमधील राष्ट्रवादी गट आणि येथील लोकांनी पाकिस्तानवर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला आहे. तसेच सिंधच्या स्वातंत्र्याची मागणी लावून धरली आहे. सिंधू देशाच्या मागणीसाठीच काही दिवसांपूर्वी येथे आंदोलन झाले होते. तुरुंगात असलेल्या सिंधी नागरिकांच्या सुटकेची मागणीही यावेळी करण्यात आली.
सिंध प्रांतात जय सिंध फ्रीडम मुव्हमेंट नावाच्या संघटनेने पाकिस्तानच्या ताब्यातून स्वतंत्र होण्याची मागणी केली आहे. सिंध देशाची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी लोकांवर चुकीचे आरोप ठेऊन त्यांना तुरुंगात टाकण्यात आल्याचा आरोप संघटनेशी संबंधित लोकांनी पाकिस्तान सरकारवर केला आहे. या लोकांवर तुरुंगात अनन्वित अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे या राष्ट्रवादी लोकांना जर लवकरात लवकर मुक्त केले नाही तर पूर्ण सिंध प्रांतात मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
खरंतर सिंध प्रांतात स्वातंत्र्याची मागणी बरीच जुनी आहे. पाकिस्तान सरकारकडून सिंधी ओळख आणि येथील लोकांचे अधिकार हिसकावून घेतले जात असल्याचा आरोप केले जात असतात. बलुचिस्तानप्रमाणेच येथेही लोकांवर अत्याचार केले जात असल्याचा दावा केला जात असतो. सिंध प्रांताची सांस्कृतिक ओळख मिटवण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकारकडून सातत्याने केला जात आहे.
बांग्लादेशात युनूस यांची खुर्ची पक्की, इमर्जन्सी बैठकीत शिक्कामोर्तब; अंतरिम सरकार तुर्तास स्थिर..
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा
सिंधप्रमाणेच बलुचिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी बलुच लेखक मीर यार बलुच यांनी सोशल मीडियावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणाच करून टाकली. तसेच या भूभागाला स्वतंत्र देशांप्रमाणे मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली होती. इतकेच नाही तर दिल्लीत बलुचिस्तानच्या दूतावासाला मंजुरी भारत सरकारने द्यावी अशी विनंती सुद्धा त्यांनी केली होती.
दुसरीकडे बलुच क्रांतिकारकांनी पाकिस्तान सरकार आणि सैन्याला पुरते (Pakistan Army) हैराण केले आहे. काही दिवसांपूर्वी जाफर एक्सप्रेस हायजॅक करून बलुच आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात 90 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. पाकिस्तान सरकारकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप बलुच नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची मागणी येथे सातत्याने केली जात आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याशी लढण्यासाठी बलुच लोकांनी स्वतःची आर्मी सुद्धा तयार केली आहे.
पाकिस्तान सरकार येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा भरपूर वापर करत आहे पण या बदल्यात येथील स्थानिकांना काहीच फायदा होत नाही असा आरोप बलुच नेते करत आहेत. हाच मुद्दा बंडखोरीला कारणीभूत ठरला आहे. 1947 मध्ये फाळणीच्या वेळी बलुचिस्तान भारत किंवा पाकिस्तान कुणाचाही हिस्सा बनलेला नव्हता. पण कालांतराने पाकिस्तानने या भागावर कब्जा केला. त्यामुळे येथील लोक सातत्याने पाकिस्तान विरोधात आंदोलने करत असतात.
गिलगिट बाल्टिस्तानशी धोका
गिलगिट बाल्टिस्तान भागातही बंडाचे निशाण दिसू लागले आहे. हा भाग पाकव्यात काश्मिरातील (Pak Occupied Kashmir) उत्तरेकडे स्थित आहे. येथील कट्टरवादी संघटनांनी वेगळ्या देशासाठी नाव देखील निश्चित केले आहे ते म्हणजे बलवारिस्तान. हा संपूर्ण प्रदेश पर्वत आणि दऱ्याखोऱ्यांनी व्याप्त आहे. पाकिस्तानचे सर्वात चांगले पर्यटन केंद्र असताना पाकिस्तान सरकारने मात्र नेहमीच धोका दिला असे येथील नेत्यांचे म्हणणे आहे. या भागात सरकारी योजना व्यवस्थितपणे लागू होत नाहीत. याच कारणामुळे या भागातही स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आहे.
येथील नागरिकांसोबत पाकिस्तान सरकारने नेहमीच दुय्यम वर्तणूक केली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू सुद्धा आधी पंजाब प्रांत (पाकिस्तानातील पंजाब) आणि पाकिस्तानातील अन्य प्रमुख भागांत पाठवल्या जातात. या नंतर गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पुरवठा केल्या जातात. अशा भेदभावाच्या वागणुकीमुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत.
बांग्लादेश, अफगाणिस्तान, धरण अन् फायटर जेट; भारताच्या कोंडीसाठी चीनचे 4 मोठे डाव..
POK ला बनवलं दहशतीचा अड्डा
भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मिरच्या अर्ध्या भागावर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे कब्जा (POK) केला आहे. याच भागाला पीओके म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानने या भागाचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला. या भागात अतिरेक्यांचे लाँच पॅड आहेत. येथील जनता मात्र पाकिस्तान सरकारच्या विरोधात आहे आणि भारतात विलीन होण्याची इच्छा व्यक्त करत असतात.
आता भारतानेही आपल्या धोरणात मोठा बदल केला आहे. पाकिस्तानशी चर्चा करण्याची वेळ आली तर फक्त आणि फक्त पीओकेवरच होईल असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत पाकिस्तानने काश्मिरच्या मुद्द्यावर जगभरात फक्त खोटेच सांगितले. परंतु आता भारताने स्पष्ट केले आहे की काश्मीर चर्चेचा मुद्दाच नाही. तर पीओके परत करण्याच्या मुद्द्यावरच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते असे म्हटले आहे.
आजमितीस पाकिस्तानची आर्थिक (Pakistan Economy) स्थिती जशी बिघडत चालली आहे ते पाहता देशातील विविध भागातील विद्रोह दडपून टाकणं सरकारला शक्य होणार नाही. सर्वच भागांतून एक सारखाच आवाज येत आहे. येथील नागरिक आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी पाकिस्तानपासून वेगळे होऊन स्वतंत्र देशाची मागणी करत आहेत.