बांग्लादेशात युनूस यांची खुर्ची पक्की, इमर्जन्सी बैठकीत शिक्कामोर्तब; अंतरिम सरकार तुर्तास स्थिर..

युनूस यांनी आज एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. सध्या तर युनूस हेच बांग्लादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख राहणार आहेत.

India Bangladesh

Bangladesh Political Crisis : बांग्लादेशात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता (Bangladesh Political Crisis) निर्माण झाली आहे. बांग्लादेशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस लवकरच राजीनामा देतील अशा चर्चा सुरू होत्या. याच दरम्यान युनूस यांनी आज एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, युनूस राजीनामा देणार का या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. सध्या तर युनूस हेच बांग्लादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख राहणार आहेत.

प्लॅनिंग अॅडव्हायजर वाहिदुद्दीन महमूद म्हणाले, युनूस यांनी राजीनामा देण्यात कोणतंही स्वारस्य दाखवलं नाही. चीफ अॅडव्हायजर आमच्या बरोबरच राहतील. त्यांनी आपण राजीनामा देणार आहोत असं कुठंच म्हटलं नाही. याच पद्धतीने बाकीचे सल्लागारही त्यांची कामे करत राहतील. आम्हाला ज्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत त्यासाठीच आम्ही येथे आहोत असे त्यांनी सांगितले.

अंतरिम सरकारचे प्रमुख युनूस यांनीच ही महत्वाची बैठक बोलावली होती. प्रशासन, राजकीय पक्ष आणि सैन्य यांच्यात धुसफूस वाढू लागली होती. तसेच युनूस यांनी स्वतःच सल्लागार पदापासून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक महत्वाची होती. राजकीय पक्षांत आपसी सहमती होत नाही असे कारण पुढे करत त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा बांग्लादेशच्या राजकारणात होती. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते.

धक्कादायक! पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीचा ताफा अडवला; लाठ्याकाठ्यांनी हल्ला

न्यूज एजन्सी यूएनबीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की युनूस सध्या ईसीएनईसीची (राष्ट्रीय आर्थिक परिषद कार्यकारी समिती) बैठकीनंतर लगेचच सल्लागारांबरोबर बैठक घेणार आहेत. यानंतर बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे प्रतिनिधीमंडळ त्यानंतर जमात-ए-इस्लामीचे प्रतिनिधीमंडळ युनूस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. याआधी युनूस यांनी नॅशनल सिटीजन पार्टीच्या नेत्यांशी चर्चा करताना राजीनामा देण्यावर विचार करत असल्याचे सांगितले होते. सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की यात मला काम करणं शक्य होणार नाही असेही त्यांनी सांगितलं होतं. या चर्चेआधी झालेल्या कॅबिनेट बैठकीतही युनूस यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

follow us