तीव्र विरोध अन् संताप..फक्त सहाच तासांत दक्षिण कोरियाने मागे घेतला मार्शल लॉ

तीव्र विरोध अन् संताप..फक्त सहाच तासांत दक्षिण कोरियाने मागे घेतला मार्शल लॉ

South Korea Martial Law : दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांनी काल रात्री देशभरात मार्शल लॉ (South Korea Martial Law) लागू केला होता. देशाच्या सुरक्षिततेचे कारण पुढे करत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाविरोधात देशातील जनतेने तीव्र विरोध केला. विरोधी पक्ष तर सरकारवर तुटूनच पडले होते. त्यामुळे फक्त सहा तासांतच राष्ट्राध्यक्षांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. रिपोर्ट्सनुसार देशातील विरोधाची स्थिती आणि लोकांतील तीव्र असंतोषाचं वातावरण पाहता आज सकाळी आदेश मागे घेण्यात आला.

South Korean Company : मूल जन्माला घाला अन् मिळवा 62 लाख; कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली खास ऑफर

राष्ट्रपती यून यांनी बुधवारी पहाटे देशाला संबोधित केले. ते म्हणाले, मी तत्काळ नॅशनल असेंब्लीची विनंती स्वीकार करत आहे. कॅबिनेटच्या माध्यमातून मार्शल लॉ हटवण्यात येत आहे. आताच एक तातडीची कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचा कोरम पूर्ण झाल्यानंतर तत्काळ मार्शल लॉ हटवण्यात येईल. यून यांनी जवळपास अर्धा तास भाषण दिले. यानंतर पु्न्हा एक बैठक बोलावण्यात आली आणि मार्शल लॉ हटविण्यास मंजुरी देण्यात आली.

मंगळवारी देशात मार्शल लॉ घोषित करण्यात आली होती. रात्री 10.20 वाजता हा लॉ देशभरात लागू करण्यात आला होता. परंतु, देशातील लोकांनी या कायद्याला तीव्र विरोध केला. सेना, विरोधी पक्षांचे नेते आणि नागरिक या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरले. लोकांचा संताप अनावर झाला होती. ही स्थिती आणखी हाताबाहेर जायला नको याचा विचार करून फक्त सहाच तासात हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकावर ओढवली.

विरोधकांचे निर्णयाविरोधात मतदान

राष्ट्रपती यून यांनी राज्य विरोधी शक्तींना नष्ट करण्याचा हवाला देत अचानक मार्शल लॉ घोषित केला. त्यांचा हा निर्णय सर्वांसाठीच अनपेक्षित होता. या घोषणेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांनी मंगळवारी रात्री 1 वाजता एक आपत्कालीन सत्र आयोजित केले. 190 खासदारांनी या निर्णयाविरोधात मतदान केलं. मुख्य विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ कोरियासह अन्य पक्षांचा देशाच्या संसदेच वरचष्मा आहे.

मोठी बातमी! दक्षिण कोरियात मार्शल लॉ लागू, राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांची घोषणा

दुसरीकडे हा आदेश मागे घेण्यात आल्यानंतर देशातील तणावाची स्थिती निवळताना दिसत आहे. या आदेशानंतर तैनात करण्यात आलेले सैनिक पुन्हा आपापल्या ठिकाणी निघाले आहेत. दक्षिण कोरियाई सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 4.22 वाजेपर्यंत सर्व सैनिकांना माघारी बोलावण्यात आले होते. उच्च सतर्कता अबाधित ठेवण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण कोरियातील या घडामोडींवर जगाचं लक्ष होतं. अमेरिकेचीही बारीक नजर होती. मॉर्शल लॉ लागू झाल्यानंतर देशभरात तीव्र निदर्शने करण्यात आली. या घडामोडींवर अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली होती. परंतु, राष्ट्रपतींनी आदेश मागे घेण्याची घोषणा करताच अमेरिकेने या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयानंतर आता देशातील जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube