कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांना सतर्क राहण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांना सतर्क राहण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

नवी दिल्ली : गेल्या दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सतर्कतेच्या उपाययोजना केल्या जात आहेत.केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सलग तिसऱ्या दिवशी बैठक घेत कोरोना परिस्ठितीचा आढावा घेतला.

आजच्या बैठकीत देशातील कोरोनासंबंधीत ताजी स्थिती काय, तसेच राज्यांची तयारी काय आहे याचा आढावा घेतला. देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी केली पाहिजे असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिले आहेत.

या संदर्भात राज्यांनी केंद्राशी समन्वय साधून एकभावनेनं काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले. कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्यात, रुग्णांचा फॉलोअप घ्यावा, त्यांच्यावर योग्य उपचार करावेत आणि लसीकरणावर भर द्यावा असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना दिले आहेत.

राज्यांनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेसंबंधित सर्व व्यवस्थापन करावं आणि आरोग्य व्यवस्थेला सतर्क करावे असेही निर्देश त्यांनी दिले. जगभरातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता भारतात येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची रॅन्डमली कोरोना चाचणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गरज पडली तर सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी घेतली जाईल असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी स्पष्ट केलं होतं.

भारतामध्ये ओमिक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकार देशातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेऊन असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाचे सँपल जीनोम टेस्टिंगसाठी पाठवण्यात येणार आहे. यातून जीनोम सिक्वेन्सिंग होऊ शकेल आणि जर कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला तर त्याला ट्रॅक करता येऊ शकेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube