पुतिन यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारा शिलेदार बनला कट्टर दुष्मन, जाणून घ्या कारण
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारविरोधात त्यांच्या एका शिलेदाराने शड्डू ठोकला आहे. तसेच पुतिन यांची सत्ता उलथवून लावणार असल्याचा इशाराही या शिलेदाराने दिला आहे. येवगेनी विक्टोरोविच प्रिगोझिन असं या शिलेदाराचे नाव असून तो वॅगनर मिलिटरी ग्रुप या खाजगी सैन्य कंपनीती जवळपास 25 हजार जवान घेऊन रस्त्यावर उतरला आहे. एक एक रस्ते आणि सरकार कार्यालय ताब्यात घेत सध्या हा गट मार्गक्रमण करत आहे. येवगेनीने लष्करी ठिकाणे ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे, यात लष्कराचे मुख्यालय आणि येथील विमानतळाचा समावेश आहे. (Yevgeny Prigozhin’s Wagner Military Group rebelled against Vladimir Putin with nearly 25,000 soldiers from his private army.)
येवगेनीच्या या भूमिकेमुळे मॉस्कोमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सैन्याची ताकद लक्षात घेता पुतीन यांच्या सुरक्षेसाठी क्रेमलिनमध्ये रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. सोबतच रोस्तोवमधील रशियन अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर रशियन सैन्यानेही आपली पूर्ण तयारी केली आहे. मॉस्कोला जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे. याशिवाय येवगेनीला अटक करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
वॅगनर मिलिटरी ग्रुपचे बंड पुतिन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. येवगेनी प्रिगोझिन हा काल-परवापर्यंत पुतीन यांच्या अगदी जवळचा होता. पुतिन यांच्या एका इशाऱ्यावर तो जीवाची बाजी लावण्यासाठीही तयार असायचा. ही कंपनी पुतिन यांना युक्रेनसोबतच्या युद्धातही मदत करत होती. याशिवाय वॅगनर मिलिटरी ग्रुपचे तब्बल 18 देशांमध्ये नेटवर्क आहे. युरोपपासून लिबिया, सीरिया, मोझांबिक, बुर्किना फासो, मोझांबिक, माली, सुदान आणि मध्य आफ्रिकन या खाजगी सैन्याचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. मात्र, आता याच येवगेनीनी बंड केल्याने रशियाची काळजी वाढली आहे.
पुतिन यांच्या विरोधात राग का?
वॅगनर ग्रुपने आपल्या ऑडिओ संदेशाद्वारे आरोप केला आहे की, रशियन सैन्याने आमच्या शिबिरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात आमचे सैनिक, आमचे साथीदार मोठ्या संख्येने मारले गेले.त्यामुळे आमच्या कमांडर्स कौन्सिलने निर्णय घेतला की देशाचे लष्करी नेतृत्व जे दुष्कृत्य करत आहे ते थांबवले पाहिजे. याला आता जो कोणी प्रतिकार करेल त्याला धोकादायक समजू आणि समूळ नष्ट करू. हा लष्करी उठाव नसून न्यायाचा मोर्चा आहे.
10 वर्षांपूर्वी गट स्थापन झाला :
वॅगनर मिलिटरी ग्रुप ही एक खाजगी रशियन लष्करी कंपनी आहे. 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्ये या गटाची स्थापन झाली होता. दिमित्री उत्किन या रशियाच्या गुप्तचर संस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याने या खाजगी लष्करी कंपनीची स्थापना केली. दिमित्रीला अॅडॉल्फ हिटलरकडून प्रचंड प्रेरणा मिळाली. हिटलर हा संगीतकार रिचर्ड वॅगनरचा चाहता होता, त्यामुळे या गटाला वॅगनरचे नाव देण्यात आले. 2022 मध्ये या समूहाची कंपनी म्हणून नोंदणी झाली आहे. याचे मुख्यालय सेंट पीटर्सबर्ग येथे आहे. अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ठिकाणी ही कंपनी जगभरात रशियाच्या बाजूने उतरत असतं.
या गटातील 80 टक्के जण गुन्हेगार :
यूएस नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलनुसार, यामध्ये 80 टक्क्यांहून अधिक लोक गुन्हेगार आहेत. त्यात माजी सैनिकही आहेत. वॅगनर ग्रुप स्वतःला राष्ट्रवादी संघटना म्हणवतो. देशसेवेची भावना असलेल्या सर्वसामान्यांनाही या संस्थेत भरती केले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीरिया, अफगाणिस्तानमधील लढाऊ यांसारख्या इतर देशांतील लोकही या संघटनेत सामील होण्याच्या तयारीत आहेत. ज्यांना आपला उदरनिर्वाहही करता येत नाही, असे लोक या गटाकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येते.
सध्या येवगेनी प्रिगोझिनच्या हातात आहेत कंपनीची सुत्र :
वॅगनर मिलिटरी ग्रुपची सुत्र सध्या येवगेनी विक्टोरोविच प्रिगोझिन याच्या हातात आहेत. हा एक मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता. अटक झाल्यानंतर अनेक वर्ष तुरुंगवास भोगला. असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, सोव्हिएत युनियनच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रिगोझिनने 10 वर्षे तुरुंगात घालवली. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर, प्रिगोझिनने बाहेर आला. तेथून सुटका झाल्यानंतर त्याने हॉट डॉग विकण्यास सुरुवात केली. नवीन रशियामध्ये रेस्टॉरंट व्यवसाय सुरू केला आणि अफाट संपत्ती कमावली.
त्यावेळी पुतिन आणि दोघांमधील जवळीक वाढली. येवगेनीचे रेस्टॉरंटची लोकप्रियता इतकी वाढली की, खुद्द पुतिन यांनीही विदेशी पाहुण्यांना या रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे येवगेनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या जवळ आले. पुढे येवगेनी पुतिन यांचा शेफही झाला. आजही रशियासह विविध देशांमध्ये त्याच्या रेस्टॉरंट्सची साखळी आहे. येवगेनीचा वाढता दबदबा लक्षात घेता त्याला पुतिन यांचे पुढील उत्तराधिकारी म्हणूनही पाहिले जात होते. मात्र, आता येवगेनीने बंडाचा बिगुल फुंकून पुतिन आणि स्वतःच्या अडचणी वाढवल्या आहेत.
वॅगनर मिलिटरी ग्रुपची कामगिरी :
- अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या मतांनुसार युक्रेनमध्ये सध्या सुमारे 50 हजार वॅगनर्स काम करत आहेत.
- मालीमध्ये वॅगनर मिलिटरी ग्रुपचे एक हजारहून अधिक सैनिक रशियाच्या मदतीने राष्ट्राध्यक्ष बनलेल्या असिमी गोइटा यांच्यासोबत उभे आहेत. त्या बदल्यात, त्यांना दरमहा सुमारे $10 दशलक्ष डॉलर्स दिले जातात.
- वॅगनर मिलिटरी ग्रुप 2017 पासून सुदानमध्ये आहे. येथील सोन्याच्या खाणींवर त्याने कब्जा केला आहे. त्या बदल्यात ते तेथील अस्थिर सरकारमध्ये एका व्यक्तीला विजयी करण्याचे आश्वासन देतात.
- वॅगनर मिलिटरी ग्रुपने 2016 मध्ये, या गटाने लिबियाच्या गृहयुद्धात भूमिका बजावली आहे.
- वॅगनर मिलिटरी ग्रुप 2014 मध्ये, क्रिमिया आणि डॉनबासमधील संघर्षात देखील सामील होता.
- ऑक्टोबर 2015 ते 2018 पर्यंत, वॅगनर ग्रुपने रशियन सैन्य आणि बशर-अल-असाद यांच्या सरकारसोबत सीरियामध्ये लढा दिला.