बांग्लादेशात पिक्चर हळूहळू बदलतोय.. युनूस यांची सत्ता धोक्यात; डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम!

Bangladesh News : बांग्लादेशात सध्या राजकीय अस्थिरतेचं (Bangladesh Political Crisis) वातावरण आहे. ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचं (Sheikh Hasina) सरकार उलथून टाकण्यात आलं होतं. यानंतर येथे स्थिरता येईल असा दावा करण्यात आला होता. परंतु, वर्षभराच्या आतच बांग्लादेश पुन्हा अराजकतेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (BNP) अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार युनूस यांच्या विरोधात उतरली आहे. पक्षाच्या नेत्यांनी काल युनूस यांची भेट घेतली. डिसेंबर 2025 पर्यंत देशात निवडणुका घ्या अशी मागणीही केली.
आताच्या सरकारमध्ये जे वादग्रस्त सल्लागार आहेत त्यांना मंत्रिपरिषदेतून काढून टाकावे आणि निवडणुकीचा स्पष्ट रोडमॅप सांगावा अशीही मागणी बीएनपीने (Bangladesh Nationalist Party) केली आहे. युनूस यांनी सांगितले होते की इतक्या लवकर निवडणुका घेणे शक्य होणार नाही. परंतु, आता निवडणुका घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढू लागला आहे.
डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्याच
बीएनपी पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्य खंदाकर मुशर्रफ हुसेन यांनी सांगितले की निवडणूक सुधारणा प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे. अंतरिम कॅबिनेटमधील सल्लागार महफूज आलम आणि आसिफ महमूद शोजिब भुइयां वादग्रस्त आहेत. त्यामुळे या दोघांना तत्काळ हटवण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या आंदोलन प्रतिनिधी म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला होता.
बांग्लादेशात युनूस यांची खुर्ची पक्की, इमर्जन्सी बैठकीत शिक्कामोर्तब; अंतरिम सरकार तुर्तास स्थिर..
राजकीय पक्षांत मतभेद तीव्र
बांग्लादेशात अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही. राजकीय पक्षांत मतभेद वाढू लागले आहेत. युनूस यांनी जमात ए इस्लामी आणि नॅशनल सिटीजन पार्टीच्या (एनसीपी) नेत्यांशीही चर्चा केली आहे. जमात ए इस्लामीचे शफीकुर रहमान यांनी सांगितले की आम्ही दोन पर्याय दिले आहेत. सर्व सुधारणा पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये निवडणुका घ्या किंवा मग रमजान महिन्यानंतर निवडणुका घ्या असे पर्याय दिल्याचे त्यांनी सांगितले. तर एनसीपीने मात्र स्थानिक संस्थांच्या निवडणुकांची मागणी केली आहे. या मागणीचा बीएनपीने विरोध केला आहे.
देशात आणि राजकारणात इतका गोंधळ सुरू असताना युनूस मात्र काहीच झालं नाही. सगळं काही ठिक आहे अविर्भावात वावरत आहेत. युनूस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी सांगितले की सर्व राजकीय पक्षांनी देशात निष्पक्ष निवडणुकीसाठी (Bangladesh Elections) युनूस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
युनूस यांनी तीन प्रमुख राजकीय पक्षांशी चर्चा केली त्यांना विश्वासात घेतले आहे. शांततेत आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी त्यांनी समर्थन दिलं आहे. पुढील वर्षात डिसेंबर आणि जून महिन्याच्या दरम्यान निवडणुका घेण्याचे संकेत युनूस यांच्या कार्यालयाने दिले आहेत. परंतु, यावर बांग्लादेशातील राजकीय पक्ष सहमत होतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बांग्लादेशात युनूस यांची खुर्ची धोक्यात
बांग्लादेश सरकारचे प्लॅनिंग अॅडव्हायजर वाहिदुद्दीन महमूद म्हणाले, युनूस यांनी राजीनामा देण्यात कोणतंही स्वारस्य दाखवलं नाही. चीफ अॅडव्हायजर आमच्या बरोबरच राहतील. त्यांनी आपण राजीनामा देणार आहोत असं कुठंच म्हटलं नाही. याच पद्धतीने बाकीचे सल्लागारही त्यांची कामे करत राहतील. आम्हाला ज्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत त्यासाठीच आम्ही येथे आहोत असे त्यांनी शनिवारी झालेल्या इमर्जन्सी बैठकीनंतर सांगितले होते. परंतु, राजकारणात घडत असलेल्या सध्याच्या घडामोडी पाहता युनूस फार काळ सत्तेत राहतील अशी शक्यता दिसत नाही.
सिंध, बलुचिस्तान अन् गिलगिट बाल्टिस्तान..पाकिस्तानचे किती तुकडे होणार?