Pakistan : पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा चीन दौरा; दोन्ही देशांत नक्की काय शिजतंय?
Pakistan PM Shahbaz Sharif visits China : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या अडचणी सातत्याने (Pakistan PM Shahbaz Sharif) वाढत चालल्या आहेत. देशात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारही हैराण झाले आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे सरकारी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळातील मंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी पगार घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे नवीन कर्ज मिळवण्यासाठी राज्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. देशातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच आता पाकिस्तानला चीनची आठवण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्प (China Pakistan Economic Corridor) रखडला आहे. याच प्रकल्पाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ मंगळवारी पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दरम्यान शरीफ चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांची भेट घेतील. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल.
Pakistan : पाकिस्तान सरकारला धक्का! जुन्या मित्राने नाकारली मोठी ऑफर?
पाकिस्तानच्या विदेश कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी सांगितले की पंतप्रधान शरीफ जिनपिंग यांच्या आमंत्रणावरून चार ते आठ जून या काळात चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश सीपीईसी प्रकल्पात सहकार्य वाढवणे हा आहे. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून सुरू आहे.
हा प्रकल्प दशकभराआधी सुरू करण्यात आला होता. यानंतर पाकिस्तानात अनेक ऊर्जा आणि मूलभूत सुविधांच्या योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले की पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.
या दौऱ्यात शरीफ ग्वांगडोंग आणि शानक्सी प्रांतांना भेट देणार आहेत. दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चांगला समन्वय ठेवला आहे. या यात्रेच्या माध्यमातून चीन पाकिस्तानबरोबर एकत्रित काम करण्यास तयार आहे असे माओ यांनी सांगितले.
Pakistan Elections : अखेर ठरलं! नवाज शरीफ यांची माघार, शहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे PM
दरम्यान चीनने मागील काही वर्षात पाकिस्तानात मोठी गुंतवणूक केली आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि बीआरआय सारख्या प्रकल्पात पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होणे चीनच्या दृष्टीने महत्वाचे आहे. मात्र या प्रकल्पांवर हल्ले वाढले आहेत. ज्या ठिकाणी या प्रकल्पाचे काम सुरू आहे तेथील स्थानिक नागरिकांचा याला विरोध आहे.