Pakistan : सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’ बंद; खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निर्णय

Pakistan : सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’ बंद; खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निर्णय

Pakistan PM Shehbaz Sharif ban on Red Carpet at Official Events : पाकिस्तानमध्ये सध्या मोठे आर्थिक संकट (Pakistan) निर्माण झाले आहे. शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारही या संकटाचा सामना करत आहे. राष्ट्रपती असिफ जरदारी यांच्यासह पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आताही सरकारने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानवर सध्या इतकी वाईट वेळ आली आहे की सरकारी कार्यक्रमांत वापरल्या जाणाऱ्या रेड कार्पेटवरही बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सरकारी खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता कोणत्याही सरकारी कार्यक्रमात रेड कार्पेट (Red Carpet) दिसणार नाही. रेड कार्पेट फक्त राजनयिक स्वागतासाठीच वापरण्यात येणार आहे.

सरकारी कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान रेड कार्पेटच्या वापरावर नाराजी व्यक्त केली होती. कॅबिनेट विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार पंतप्रधानांनी यापुढे अधिकृत कार्यक्रमांमध्ये मंत्री आणि सरकारी व्यक्तींसाठी रेड कार्पेट वापरले जाणार नाही, असे आदेश दिले. एका अहवालानुसार आता फक्त विदेशातून येणाऱ्या राजदूतांसाठी प्रोटोकॉल म्हणून वापरले जाणार आहे.

“आम्हाला पगार नको” पाकिस्तानच्या पंतप्रधान अन् मंत्र्यांनी नाकारला पगार

राष्ट्रपती, पंतप्रधान अन् मंत्र्यांना पगार नाही 

दरम्यान, याआधी शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी पगार आणि अन्य लाभ घेणार नाही, असा निर्णय घेतला होता. त्याआधी राष्ट्रपती असिफ जरदारी यांनीही पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले होते. नव्या मंत्रिमंडळाने याआधीच सरकार अनुदानित परदेश दौऱ्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्री, खासदार आणि सरकारी अधिकारी परवानगी घेतल्याशिवाय सरकारी निधी वापरून परदेश दौरे करू शकणार नाहीत.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती अरिफ अल्वी यांना दर महिन्याला 8 लाख 46 हजार 550 रुपये पगार मिळत होता. ही रक्कम सन 2018 मध्ये संसदेने ठरवून दिली होती. मात्र महसुलावरील वाढलेला भार पाहता नव्या राष्ट्रपतींनी पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. यानंतर नव्या सरकारने अनावश्यक खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. याद्वारे सरकारी खर्च कमी केला जात आहे.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये ट्विस्ट! बाबर आझम पुन्हा कॅप्टन; ‘या’ खेळाडूला कर्णधारपदावरून हटवले

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज