पाकिस्तान क्रिकेटमध्ये ट्विस्ट! बाबर आझम पुन्हा कॅप्टन; ‘या’ खेळाडूला कर्णधारपदावरून हटवले
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा ट्विस्ट आला (Pakistan Cricket) आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवले (Babar Azam) आहे. तर शाहीन शाह आफ्रिदीची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. टी 20 क्रिकेटसाठी आफ्रिदीच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा बाबर आझमला कप्तानी दिली गेली आहे. त्यामुळे आफ्रिदी फक्त गोलंदाज म्हणून संघात राहिल.
या निर्णयाची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर दिली आहे. पासीबीच्या निवड समितीच्या शिफारसीनंतर अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी बाबर आझमला टी 20 आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केले. 2023 मधील विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीनंतर आझमकडील कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. परंतु, काहीच महिन्यांनंतर त्याला पुन्हा कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. बाबर आझम एप्रिल महिन्यात कर्णधारपदाची सूत्रे हाती घेईल.
शाहीन शाह आफ्रिदीने न्यूझीलँड दौऱ्यात संघाचे नेतृत्व केले होते. परंतु, या दौऱ्यात पाकिस्तानचा पराभव झाला. परंतु, फक्त एका पराभवानंतर कर्णधारपदावरून काढून टाकणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जात होता. या प्रश्नाचे उत्तर मात्र बोर्डाकडे नव्हते. असे असतानाही शाहीन शाह आफ्रिदीला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शाहिद आफ्रिदीला बाबर आझम कर्णधारपदी नको? पाक क्रिकेटमध्ये खळबळ
बाबरने का दिला होता राजीनामा ?
एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर नोव्हेंबर 2023 मध्ये बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. पाकिस्तान संघाने या विश्वचषकात नऊपैकी फक्त चार सामने जिंकले होते आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर गडगडला होता. खुद्द बाबरलाही फलंदाजीत फारशी कमाल दाखवता आली नव्हती. त्यानंतर बाबरवर चहुबाजूंनी टीका होत होती. यानंत त्याने कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.
इम्राननंतर बाबर हा दुसरा यशस्वी कर्णधार
बाबर आझमने आतापर्यंत 134 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत 78 सामने जिंकले आहेत, तर 44 सामने हरले आहेत. 1992 च्या विश्वचषक विजेत्या इम्रान खाननंतर बाबर हा दुसरा सर्वात यशस्वी पाकिस्तानी कर्णधार आहे.
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
बाबरच्या आधीही दोन राजीनामे
वर्ल्ड कपमधील लाजिरवाण्या कामगिरीमुळे यापूर्वी मुख्य निवडकर्ते इंझमाम उल हक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यावर हितसंबंधांचाही आरोप आहे. पाकिस्तानचा संघ शेवटचा सामना खेळून मायदेशी परतला तेव्हा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलनेही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ आता बाबरनेही कर्णधारपद सोडले.