Supriya Sule : मी ड्रामा क्वीन! … तर घरीच प्रसूत झाले असते!
नवी दिल्ली : माझी घरी ड्रामा क्वीन म्हणून ओळख आहे. मला छोटेसे जरी खरचटले किंवा लागले तरी मी खूप आरडाओरडा करायचे आणि सगळीकडे माहोल तयार करायचे. मात्र, माझ्या या ड्रामाचा मलाच खूप त्रास झाला असता… अन् माझ्या मुलाच्या जन्मावेळी वेळी मी घरातच प्रसूत झाले असते, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
एका खासगी यू ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी आपल्या ‘ड्रमेबाजी’चे रहस्य सांगितले. सुळे म्हणाल्या की, या माझ्या ड्रमेबाजीमुळे मलाच त्रास झाला. कारण माझ्या मुलाच्या जन्मावेळी वेळी मला पोटात खूप त्रास होत होता. पोट खूप दुखत होते. मी हे माझी आई आणि पती सदानंद सुळे यांना सांगितले. मात्र, दरवेळी मी जशी ड्रामा करते तसेच आताही ड्रामा करत आहे, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी जेवण कर आणि झोपी जा, असे सांगितले. तसेच दोघेही झोपी गेले.
मात्र, यानंतर मला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे थोड्यावेळाने मी स्वतः डॉक्टरांना फोन करून सांगितले. परंतु, त्यांनाही वाटले मी ड्रामा करत आहे. कारण माझ्या आईने माझ्या ड्रमेबाजीबद्दल त्यांनाही सांगून ठेवले होते. त्यामुळे त्यांनी आराम कर त्यानंतर मला एक तासाने फोन कर असे सांगितले. मात्र, पोटात कळा असह्य होत होत्या. त्यामुळे एक तासाने फोन केला तेव्हा डॉक्टरांनी मला ऍडमिट व्हायला सांगितले. हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टरांना खरी परिस्थिती समजली आणि त्यांनी तातडीने आईला बोलवून घ्या, केव्हाही डिलिव्हरी होईल. तुम्ही आणखी काही काळ घरी थांबला असता तर घरीच डिलिव्हरी झाली असती, असे सांगितले. तेव्हा कुठे सर्वांनाच कळाले की मी ड्रामा करत नव्हते, असा बाळंतपणावेळीचा अनुभव यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बाळंतपणा हा काळ कुठल्याही ‘स्त्री’साठी अतिशय आनंदी आणि सुखाचा असतो. कारण या काळात सर्वच जण त्या ‘स्त्री’ची विशेष करून काळजी घेत असतात. आई हाेणे हे काेणत्याही स्त्रीसाठी अतिशय आनंदी भावना असते. माझीही या काळात आई, वडील आणि माझ्या पतीने विशेष काळजी घेतली.