मंत्री गडकरींच्या कार्यालयात आलेला धमकीचा कॉल थेट बेळगावच्या तुरुंगातून…
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलीय. हा कॉल एका सराईत गँगस्टरनं केला आहे. सध्या तो बेळगाव तुरुंगामध्ये कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडील फोनच्या माध्यमातून त्यानं कॉल केल्याचं समोर आलंय. त्यामुळं तुरुंग प्रशासनाचा अनागोंदी कारभार देखील यानिमित्तानं समोर आलाय. तुरुंगात कैद्याकडं मोबाईल फोन कसा काय असू शकतो? हाच सर्वांना पडला प्रश्न आहे.
केंद्रीय मंत्री गडकरींच्या कार्यालयात फोन कॉलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचं नाव जयेश पुजारी असून तो हत्या प्रकरणात बेळगाव तुरुंगामध्ये कैदेत आहे. यापूर्वी 2016 मध्ये तो तुरुंगातून पळून गेला होता. त्याशिवाय त्यानं तुरुंगातूनच अशाच पद्धतीनं अनेकदा मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे.
गडकरींच्या कार्यालयात दिलेल्या धमकीमागं एकटा जयेश पुजारी आणि त्याची टोळी आहे की, अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागं आहेत? याचा तपास पोलीस करताहेत. पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकमधील तुरुंगातून असे गैरप्रकार सुरु असल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्यात.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयजवळील जनसंपर्क कार्यालयात तीनदा धमकीचा फोन आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. एटीएस आणि नागपूर पोलिसांच्या तपासानुसार, तीनदा आलेल्या धमकीच्या फोन कॉलचा संबंध कर्नाटकात असल्याचं समोर आलं होतं. धमकीचा फोन बीएसएनएलच्या दूरध्वनीवरुन केल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली होती.