आम्ही शांत बसणार नाहीत! आता मुंबई बंद करणार, पोलिसांवर गंभीर आरोप करत आदित्य ठाकरे आक्रमक
दादरमधील शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आदित्य ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे.
दिल्लीनंतर आता मुंबईतही आंदोलनावरून (Delhi) राजकीय वातावरण तापलं आहे. शिवाजी पार्क परिसरात सीजेपीचं आंदोलन सुरू असताना मुंबई पोलिसांनी समर्थकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. यानंतर दादरमधील शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. रस्ता बंद करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून, या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला आहे.
शिवसेना भवनाबाहेर घडलेल्या या प्रकारानंतर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आंदोलनात सहभागी झाले. आदित्य ठाकरे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असताना शिवसेना भवन परिसरात मोठी गर्दी जमली. त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरूप आलं असून, परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
सर्व मुंबईकरांना आणि शिवसैनिकांना शिवाजी पार्कात येण्याचे आवाहन, अमित ठाकरे यांना सोडवण्यासाठी आम्ही शिवाजी पार्कात जात आहोत. आता हे आंदोलन मोठे होणार आहे. आम्ही आता थांबणार नाही असे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिले आहे.त्यांच्यासोबत युवा नेते तेजस ठाकरे देखील सोबत होते.
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आणि त्याचे बंधू तेजस ठाकरे यांनी शिवसेना भवन परिसरात ठिय्या आंदोलन करीत मनसेचे नेते अमित ठाकरे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी अडवल्याचा निषेध केला. त्यानंतर काही वेळानंतर अमित ठाकरे आणि त्यांच्या सोबत नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांना सोडण्यात आले. त्यानंतर आदित्य आणि अमित यांनी उद्याही अशाच प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जोपर्यंत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात आपणे उद्याच्या आंदोलनाची परवानगी घेण्यासाठी गेल्याचे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सांगितले.