मी कधी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं; Gen Zच्या प्रश्नावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य

‘मंथन फॉर युवा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी तरुणांशी मुक्त संवाद साधताना आपल्या राजकीय प्रवासातील अनेक महत्त्वाचे अनुभव उलगडले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 23T174910.045

Chief Minister Fadnavis’s major statement : नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘मंथन फॉर युवा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांशी मुक्त संवाद साधताना आपल्या राजकीय प्रवासातील अनेक महत्त्वाचे अनुभव उलगडले. यावेळी उपस्थित तरुणांनी मुख्यमंत्री होण्याचा प्रवास, राजकारणात येण्यामागील प्रेरणा आणि मोठ्या जबाबदाऱ्यांसोबत येणारा प्रचंड दबाव ते कसा हाताळतात, यासंदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी भारतीय लोकशाहीची ताकद, आपल्या संघर्षमय राजकीय वाटचालीच्या आठवणी आणि आंदोलनांमधील अनुभव सांगितले.

संवादाच्या सुरुवातीलाच फडणवीस यांनी ‘मंथन फॉर युवा’ या उपक्रमाचे कौतुक केले. तरुणांच्या मनातील प्रश्न समाजासमोर आणण्याचे आणि विविध क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम या मंचाने केल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री कसा बनतो, या प्रश्नावर बोलताना त्यांनी भारतीय लोकशाहीची ताकद अधोरेखित केली. हिंदी चित्रपटात एखादा नायक एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनू शकतो, पण प्रत्यक्षात तो प्रवास तितका सोपा नसतो. मात्र भारताच्या संविधानाने आणि लोकशाहीने प्रत्येकाला समान संधी दिली आहे. जो देवेंद्र फडणवीस कधी नगरसेवक बनेल असेही वाटत नव्हते, तो मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. गुजरातमधील रेल्वे स्थानकावर चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान बनतो. ही भारताच्या संविधानाची, लोकशाहीची आणि युवाशक्तीची ताकद आहे, असे फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, जेव्हा ते राजकारणात आले, तेव्हा सत्तेची कोणतीही अपेक्षा नव्हती. विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला होता. आम्हाला वाटायचे की विरोधी पक्षात राहूनच आयुष्यभर संघर्ष करायचा. आंदोलने करायची, जनतेसाठी लढायचे. पण जनतेने विश्वास दाखवला आणि पायरी-पायरीने पुढे जात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. त्यामुळे इथे बसलेली कोणतीही व्यक्ती जर ठाम निर्धार करून कामाला लागली, तर भारताची लोकशाही आणि संविधान तिला मुख्यमंत्री बनवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुणालला आत्महत्या करायचीच नव्हती पण त्याच्या बापाने…, खवल्या डोंगरावरील चांदगुडे प्रकरणात मोठा खुलासा

दरम्यान, एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्यांचा दबाव ते कसा हाताळतात, या प्रश्नालाही त्यांनी सविस्तर उत्तर दिले. राजकारण हा माझ्यासाठी व्यवसाय नाही. राजकारण हे माझे मिशन आहे. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे ते सर्वात प्रभावी साधन आहे, असा माझा विश्वास आहे. त्यामुळे दबावापेक्षा उद्दिष्ट महत्त्वाचे वाटते, असे ते म्हणाले.

आपल्या तरुणपणातील आंदोलनांची आठवण सांगताना फडणवीस म्हणाले की, वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. “त्या काळात लाल चौकात भारताचा तिरंगा फडकवता येत नव्हता. आम्ही हजारो तरुण जम्मू आणि उधमपूरपर्यंत गेलो. आम्हाला रोखण्यात आले, अटक करण्यात आली. त्यानंतर आम्ही दिल्लीत जाऊन तत्कालीन पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. पुढे 1992 मध्ये डॉ. मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाल चौकात तिरंगा फडकवण्यात आला,” अशी आठवण त्यांनी सांगितली.

याचबरोबर रामजन्मभूमी आंदोलनातील सहभागाचाही त्यांनी उल्लेख केला. मी 20 वर्षांचा असताना प्रयागराजमार्गे अयोध्येकडे गेलो होतो. त्या आंदोलनादरम्यान पहिल्यांदाच गोळीबार जवळून पाहिला. आमच्यावर लाठीमार झाला, गोळ्या झाडण्यात आल्या आणि आम्हाला अटक करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील बदायूं येथील केंद्रीय कारागृहात 18 दिवस राहावे लागले. मात्र त्यानंतरही आंदोलनातील सहभाग थांबवला नाही, असे त्यांनी सांगितले.

जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांची प्रतिक्रिया; ‘ओबीसी आरक्षण संपलं कुठे?’

तसेच 1992 मध्ये बाबरी ढाचा पाडला गेला, त्या वेळी आपण तेथे उपस्थित होतो आणि त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. आपल्या संघर्षमय राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना ते म्हणाले, जेव्हा सार्वजनिक जीवनाची सुरुवातच संघर्ष, आंदोलने, अटक आणि आव्हानांमधून होते, तेव्हा दबाव कसा हाताळायचा हे आपोआप शिकायला मिळते. त्या अनुभवांनीच मला आजच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची ताकद दिली आहे.

या संवादातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचा, लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचा, संघर्षाला सामोरे जाण्याचा आणि समाजासाठी काम करण्याचा संदेश दिला. तसेच भारतीय लोकशाहीमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या मेहनतीच्या बळावर सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचू शकते, हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

follow us