चोरीला गेलेला मेंदू परत आणण्यासाठी समिती नेमा, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
एसआयआरवरील आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, तीनही आयुक्तांनी एसआयआरसह सर्व प्रक्रिया एकमताने झाल्याचे स्पष्ट केले आहे.
Fadnavis fiercely criticizes the opposition : भारतीय संविधान हातात घेऊन राहुल गांधी ते दाखवत असले, तरी संविधानाने निर्माण केलेल्या संवैधानिक संस्थांवर त्यांचा विश्वास नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राहुल गांधी संवैधानिक संस्थांना बदनाम करून देशातील व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्यांची भूमिका अतिडाव्या विचारांकडे झुकल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात ज्या प्रकारच्या अराजकतेबाबत चिंता व्यक्त केली होती, त्याच दिशेने राहुल गांधींचे राजकारण सुरू असल्याचा दावाही फडणवीसांनी केला.
निवडणूक आयोग आणि एसआयआरवरील आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, तीनही आयुक्तांनी एसआयआरसह सर्व प्रक्रिया एकमताने झाल्याचे स्पष्ट केले आहे. कॅबिनेट सेक्रेटरीकडे पाठवलेले पत्र धोरणात्मक मतभेदांशी संबंधित नसून डेप्युटेशनवरील नियुक्तीशी संबंधित होते. त्यामुळे या मुद्द्यावर जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस आणि राहुल गांधी निवडणूक आयोगासह संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही फडणवीसांनी केली. विरोधक जिंकले की निवडणूक आयोग चांगला आणि भाजप जिंकला की त्याच आयोगावर प्रश्न उपस्थित केले जातात, असा टोला त्यांनी लगावला. यापूर्वी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि आता थेट निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
गुवाहाटीतील CJPच्या पहिल्याच स्वयंसेवक मेळाव्याला पोलिसांचा मज्जाव; सह-संयोजक आशुतोष रांका ताब्यात
काही जणांकडून निवडणुका रद्द करण्याची मागणी केली जात असल्याच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. हे व्होट चोरी म्हणतात, पण यांचा मेंदूच चोरीला गेला आहे. तो चोरीला गेलेला किंवा गहाण ठेवलेला मेंदू परत आणण्यासाठी एखादी तपास समिती नेमता येईल का, अशी माझी पंतप्रधानांकडे मागणी आहे, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.
पश्चिम बंगालमधील एसआयआरवरही त्यांनी विरोधकांना सवाल केला. ज्या 15 मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार कमी झाले, तिथे टीएमसी कशी जिंकली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्यांमधील त्रुटी हा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न असून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करावे, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राज्यातील 265 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून या तालुक्यांमध्ये सरसकट मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तातडीच्या 12 उपाययोजनांना मान्यता देण्यात आली असून आवश्यक ठिकाणी पंचनामे करून बाधितांना तातडीने मदत दिली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.