‘लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न’; NEET मुद्द्यावर खर्गेंनी संसदेत सरकारला धारेवर धरले
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Mallikarjun Kharge targets the government : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नीट पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून संसदेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
कामकाज सुरू होताच खर्गे यांनी नीट परीक्षा घोटाळा, कथित पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलंनाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हा केवळ एका परीक्षेचा विषय नसून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि भविष्याशी संबंधित विषय असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणावर संसदेत तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली.
सभागृहात बोलताना खर्गे म्हणाले, देशभरातील विद्यार्थी चिंतेत आहेत. परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. लाखो विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली, मात्र पेपरफुटीच्या आरोपांमुळे त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा गंभीर विषयावर सरकार मौन का बाळगत आहे? संसदेत यावर सविस्तर चर्चा झालीच पाहिजे.
यावेळी खर्गे यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचा देखील उल्लेख केला. नीट प्रकरणाच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा घणाघात करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘मी ठणठणीत मला संसद मोर्चात जायचयं, कृपया मला डिस्चार्ज द्या’; वांगचुक यांचे रुग्णालयाला पत्र
विरोधकांच्या मागणीला इंडिया आघाडीतील विविध पक्षातील सदस्यांनी पाठिंबा दिला. नीट प्रकरणावर चर्चा घ्यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करत विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे राज्यसभेतील वातावरण तापले आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सभापतींना कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब करावे लागले.
लोकसभेत देखील या मुद्द्याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षातील सदस्यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. नीट परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान, नीट पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात देखील या संदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरू असून संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. लाखो विद्यार्थी आणि पालक या प्रकरणात न्यायालय आणि सरकारच्या पुढील निर्णयांची प्रतीक्षा करत आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नीटचा मुद्दा केंद्रस्थानी आल्याने आगामी दिवसांत संसदेत या विषयावर आणखी तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांनी हा मुद्दा सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, तर सरकारकडून यावर कोणती भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकंदरीत, देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित नीट पेपरफुटी प्रकरण आता न्यायालय, रस्त्यावरचे आंदोलन आणि संसद अशा तिन्ही पातळ्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून विद्यार्थ्यांना न्याय आणि परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे ठाकले आहे.