मोठी बातमी! प्रशांत जगताप यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम, नक्की काय घडलं?
आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास जगतापांनी केलेला स्पष्ट विरोध केला होता. त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. (Pune) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडं सोमवारी सोपवल्याची माहिती समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास जगतापांनी केलेला स्पष्ट विरोध त्यांना भोवला असल्याची चर्चा आहे. प्रशांत जगताप पुढे काय करणार याबाबत अद्याप स्पष्टता नसून ते काँग्रेसमध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत समिती गठित करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा या समितीत प्रवेश आहे. या समितीतून पुणे शहराध्यक्षपदी असलेल्या प्रशांत जगताप यांना वगळण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांची आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत जगतापांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुप्रिया सुळे यांच्याकडे राजीनामा देण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलं आहे.
पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले
प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष होते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा सामना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांच्याशी झाला आहे. तुपेंना 1 लाख 34 हजार 810 मतं मिळाली होती, तर प्रशांत जगताप यांना 1 लाख 27 हजार 688 मतं पडली होती. जेमतेम सात ते आठ हजार मतांच्या फरकाने जगतापांना पराभव स्वीकारावा लागला होता.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मी राजीनामा देईन असा इशारा जगतापांनी दिला होता. आता प्रत्यक्ष बोलणी सुरु असल्याने विरोध करणाऱ्या जगतापांवर पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आल्याची चर्चा आहे. प्रशांत जगताप हे शरद पवारांना मानणाऱ्यामधील एक आहेत. मागे माध्यमांशी याच विषयावर बोलताना त्यांना अश्रूही अनावर झाले होते.
