मनोज जरांगे पाटलांची मुंबईला जाण्याची घोषणा; आमदार रोहित पवारांचा सरकारला महत्वाचा सल्ला
Rohit Pawar on Jarange Strike Mumbai : लातूरमध्ये बोलताना रोहित पवार यांनी सरकारकडं जरांगे यांच्या आंदोलनाबाबत महत्वाची मागणई केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील (Jarange) राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 15 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत असून, आता त्यांनी आंदोलन मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होऊन आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला आंदोलन मुंबईत पोहोचण्यापूर्वीच चर्चेतून तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे.
लातूरमध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सरकारने तातडीने पुढाकार घेण्याची मागणी केली. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने आजच जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी आणि चर्चेतून मार्ग काढावा, असे त्यांनी म्हटले. आंदोलन मुंबईत पोहोचल्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. त्याचा परिणाम आंदोलकांसोबतच मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांवरही होण्याची शक्यता असल्याने सरकारने आधीच चर्चा करून तोडगा काढावा, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली.
‘आता ही शेवटची लढाई, मेलो तरी मागं हटणार नाही’; जरांगेंचा सरकारला इशारा!
दरम्यान, उपोषणाच्या 15 व्या दिवशी जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या 20 सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर पुढील उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अंतरवाली सराटीतील महिला आंदोलकांनीही मुंबईला सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, महिलांनी आझाद मैदानावर येण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या घरी हळदी-कुंकू घेऊन जावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.
महिलांनी सौभाग्याचं लेणं असलेलं कुंकू घेऊन गेल्यानंतर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्वीकारणार नसतील, तर ते कसले हिंदू, असा खोचक सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे मुंबई आंदोलनाच्या घोषणेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे. सरकारने चर्चेतून प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत असताना जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आगामी काळात सरकारसमोर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.