नाव, फोटो अन् शैलीवर चाकणकरांचा कॉपीराइटचा दावा; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ला कोर्टात अडकणार?
Rupali Chakankar Trademark Registration : नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीच्या वापरावर रुपाली चाकणकरांचा कायदेशीर इशारा.
Rupali Chakankar Trademark Registration : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी आता आपल्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित बाबींच्या वापराबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वतःचे नाव, छायाचित्र, ओळख आणि वैयक्तिक शैली यांची ट्रेडमार्क नोंदणी केल्याची माहिती त्यांनी (Chakankar) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून दिली आहे. यापुढे त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांच्या नावाचा, फोटोचा किंवा विशिष्ट शैलीचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे, रील्स, व्हिडीओ, चित्रपट, टीझर आणि जाहिरातींच्या माध्यमातून अशा प्रकारचा वापर केल्यास केवळ नोटीस न बजावता दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमधून स्पष्ट केले आहे. त्यामुळे चाकणकर यांच्या या निर्णयाकडे केवळ वैयक्तिक ओळखीच्या संरक्षणापुरते मर्यादित न पाहता, सध्या चर्चेत असलेल्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवरही पाहिले जात आहे.
चाकणकर यांच्या या भूमिकेची चर्चा सुरू असतानाच नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची पार्श्वभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या अशोक खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले असून, या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. खरातसोबतचे छायाचित्र आणि काही व्हिडीओ समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
त्यावेळी त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होत्या. या प्रकरणावरून राजकीय दबाव वाढल्यानंतर त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिल्याने हा विषय अधिक चर्चेत आला होता. खरात प्रकरणातील घडामोडी आणि त्यावरून चाकणकर यांना करावा लागलेला राजकीय सामना यामुळे त्यांच्या प्रत्येक नव्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, याच खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या नावाने चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद रुपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य असलेली भूमिका साकारत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या बोलण्याची पद्धत, देहबोली आणि व्यक्तिमत्त्वाशी मिळतेजुळते सादरीकरण यामुळे चित्रपटाच्या टीझर आणि प्रमोशनल साहित्याची चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत चाकणकर यांनी आपल्या नावासह फोटो आणि वैयक्तिक शैलीच्या ट्रेडमार्क नोंदणीची माहिती देत विनापरवानगी वापराविरोधात कायदेशीर इशारा दिल्याने या चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रमोशनच्या संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, ट्रेडमार्क नोंदणीचा निर्णय केवळ याच चित्रपटाला उद्देशून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
दुसरीकडे, चाकणकर यांच्या या भूमिकेवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी त्यांच्या निर्णयावर टीका करत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. खरात प्रकरणावर प्रश्न उपस्थित होऊ नयेत, यासाठी न्यायालयीन कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे चाकणकर यांच्या ट्रेडमार्क नोंदणीच्या निर्णयाला केवळ वैयक्तिक ओळखीच्या संरक्षणाचा विषय न मानता त्याकडे सध्याच्या राजकीय घडामोडींच्या संदर्भातही पाहिले जात आहे. एका बाजूला खरात प्रकरणामुळे निर्माण झालेली राजकीय कोंडी, दुसरीकडे त्याच विषयावर आधारित चित्रपटाची चर्चा आणि आता स्वतःच्या प्रतिमा व शैलीच्या वापरावर निर्बंध आणण्याची चाकणकर यांची भूमिका, यामुळे आगामी काळात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे.
माझे नाव,माझा फोटो,माझी ओळख,माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे.
माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो,ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो,व्हिडिओ, फिल्म,रील,टीझर,प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी,वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास,अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 15, 2026