एक्सवरील पत्रातून सोनम वांगचुक यांची हाक; विद्यार्थ्यांना न्याय द्या, संवादाचा मार्ग खुला करा

विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेसमोर मांडण्याची संधी मिळेपर्यंत आपण आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (66)

Sonam Wangchuk’s Letter : पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपल्या उपोषणाच्या 23 व्या दिवशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक हस्तलिखित पत्र पोस्ट करत केंद्र सरकार आणि पोलीस प्रशासनाला भावनिक आवाहन केले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या युवकांवर होत असलेल्या कारवाईबद्दल चिंता व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेसमोर मांडण्याची संधी मिळेपर्यंत आपण आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वांगचुक यांनी पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे की, शांततेत आंदोलन करणाऱ्या युवकांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, ते पाहून मी माझे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी नेत्यांना संसद भवनात खासदारांची भेट घेण्याची परवानगी मिळेपर्यंत किंवा मला हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेण्याची परवानगी मिळेपर्यंत माझं उपोषण सुरू राहील.

पत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या संयमाचे आणि शांततेच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले आहे. आंदोलनादरम्यान विविध प्रकारच्या दबाव आणि चिथावणीखोर परिस्थिती निर्माण झाली असताना देखील युवकांनी शांतता कायम ठेवली, यामुळे आपण भावुक झालो असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. सोनम वांगचुक यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाला थेट आवाहन करत विद्यार्थ्यांना संसदेसमोर आपली भूमिका आणि समस्या मांडण्याची संधी द्यावी असे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना आज किंवा उद्या संसदेसमोर त्यांच्या तक्रारी मांडण्याची परवानगी देऊन हा प्रश्न सोडवता येऊ शकतो, असे त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे.

CJP आंदोलकांनी नड्डांसमोर ठेवल्या तीन प्रमुख मागण्या; पण नड्डांचा CJP ला आंदोलन मागे घेण्याचा सल्ला !

याशिवाय शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाची मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि संबंधित जबाबदार व्यक्तींना उत्तरदायी ठरवले जाईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. सफदरजंग रुग्णालयातून लिहिलेल्या या पत्रात वांगचुक यांनी आंदोलनकर्त्या युवकांच्या संयमावर विश्वास व्यक्त करत, आज जसा संयम आणि सहनशीलता त्यांनी दाखवली, तसाच उद्या देखील दाखवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, नीट परीक्षा गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेच्या प्रश्नांवरून राजधानी दिल्लीत आंदोलन अधिक तीव्र होत आहे. संसद मार्च, विद्यार्थी आंदोलने आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या सहभागामुळे या आंदोलनाने राष्ट्रीय पातळीवर मोठे स्वरूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत सोनम वांगचुक यांचे पत्र आणि उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरत असून, सरकार यावर काय भूमिका घेते याकडे देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

follow us