दुष्काळात धाराशिवच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! विमा कंपन्यांना थकीत रक्कम देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, राणा पाटलांची माहिती
Dharashiv Farmers Crop Insurance : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळं धाराशिवमधील साडेतीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार.
Dharashiv Farmers Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत (Dharashiv) असलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2020 मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी विमा कंपन्यांनी नाकारलेली 227 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पुढील 15 दिवसांच्या आत ही रक्कम वितरित करण्याचे आदेश देण्यात आल्याने जिल्ह्यातील सुमारे 3.5 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
2020 मध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी दावा केला होता. मात्र, विविध कारणे पुढे करत विमा कंपन्यांनी भरपाई देण्यास नकार दिला. काही शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत पोर्टलवर नुकसानीची नोंद केली नसल्याचे कारण देत त्यांचे दावे फेटाळण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयात लढा दिल्यानंतर अखेर शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आहे.
या निर्णयाचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वागत केले आहे. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या भक्त असलेल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 7 हजार रुपये मिळणार असून, इतर पात्र शेतकऱ्यांनाही भरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याचे पाटील यांनी सांगितले. पीक विम्याच्या रकमेबाबत कंपन्यांकडून होत असलेल्या टाळाटाळीला या निकालामुळे चाप बसल्याचेही त्यांनी नमूद केले.
माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केले आहे. 2021 मध्ये या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत पोर्टलवर नोंदणी केली नसल्याचे कारण देत विमा नाकारण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय दिला. या निकालामुळे धाराशिवमधील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.