मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष परवडणार नाही, भारतात समस्या गंभीर; WHO नेही दिला ‘हा’ इशारा

Oral Health Tips : चांगलं आरोग्य हवं असेल तर शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. ब्लड प्रेशर, डायबिटीस (Diabetes) यांसारख्या आजारांवर आपण लक्ष देतो. औषधोपचारही करतो पण मौखिक आरोग्याकडे (Oral Health) आपण इतके लक्ष देतो का? तर याचं उत्तर नाही असेच नाही. मौखिक आरोग्य चांगलं नसेल तर याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर देखील पडू शकतो. ही गोष्ट ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.
मौखिक आरोग्याच्या समस्या जगभरात वाढत चालल्या आहेत. लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला दातांच्या समस्यांनी हैराण केले आहे. खाण्यापिण्यात गडबड आणि ओरल हेल्थकडे दुर्लक्ष ही यामागची सर्वात मोठी कारणं आहेत.
दातांना कीड लागणे ही अगदी सामान्य समस्या आहे. देशांत असे कोट्यावधी लोक सापडतील. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. शुगर किंवा कार्बोहायड्रेटेड युक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने तसेच दातांची योग्य पद्धतीने सफाई न केल्याने दात किडतात. व्यतिरिक्त दातांच्या हिरड्यांना सूज, तोंडातून दुर्गंधी येणे, दातांना वेदना होणे या समस्या ओरल हेल्थ खराब झाल्याची लक्षणे असू शकतात.
मधूमेह, कॅन्सरग्रस्तांना धक्का! सरकारी नियंत्रणातील औषधांची दरवाढ? कारण काय..
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते (World Health Organization) मौखिक आजार अनेक देशांसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. जगभरात जवळपास 350 कोटी लोक मौखिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत असा अंदाज आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज 2019 नुसार दातांना कीड लागणे सर्वात कॉमन समस्या आहे. यावर वेळीच लक्ष देऊन ही समस्या संपुष्टात आणता येऊ शकते.
मौखिक आरोग्य समस्यांचे दुष्परिणाम
आरोग्य तज्ज्ञांच्या मते जवळपास 50 टक्के प्रौढ भारतीय पेरियोडॉन्टल आजाराने ग्रस्त आहेत. लहान मुलांमध्ये दातांचे किडणे व्यापक प्रमाणात आढळते. पेरिओडोंटल आजार हा हिरड्यांचा आजार म्हणून देखील ओळखला जातो. बॅक्टेरियल संक्रमणामुळे हा आजार होतो. या आजारात हिरड्या आणि दात यांना आधार देणाऱ्या हाडांना इजा पोहोचते. मौखिक आरोग्याकडे लक्ष न देणे हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे.
काही अभ्यासातून असेही दिसून आले आहे की मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग आणि स्ट्रोक होण्याचे प्रमाण जास्त असते. काही तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की पेरिओडोंटायटीस आणि हिरड्यांत सूज उत्पन्न करणारे बॅक्टेरिया रक्तप्रवाहाच्या माध्यमातून शरीराच्या अन्य भागांत देखील पोहोचू शकतात. यामुळे हृदय आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊ शकते तसेच या वाहिन्यांना नुकसान होण्याचाही धोका राहतो.
चुकीच्या आहारामुळे भारतीयांना असंसर्गजन्य आजारांनी ग्रासलं; ICMR-NIN ने जारी केला डाएट प्लॅन
दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्याच
दातांच्या समस्या कमी करून मौखिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी दिवसातून दोन वेळा व्यवस्थित ब्रश करणे खूप आवश्यक आहे. ब्रश करण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या टूथपेस्टचा वापर करू शकता. हर्बल टूथपेस्टमध्ये असलेले घटक दातांना बळकट आणि चमकदार बनवतात. तसेच तोंडाची दुर्गंधी यामुळे कमी होते.
मौखिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काहीही खाल्ल्यानंतर पाण्याने व्यवस्थित गुळणा करा. यामुळे दातांच्या फटीत अडकलेले अन्नाचे कण निघून जातात. यामुळे दातांना कीड लागण्याची समस्या काही प्रमाणात कमी होते.
दिवसातून भरपूर पाणी पित रहा. पाणी पित राहिल्याने अन्न पदार्थांचे कण दातांना चिटकून राहत नाही. तोंडातील लाळेचे प्रमाण वाढविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे मौखिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
टीप : ही माहिती मेडिकल रिपोर्ट्सच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. माहिती उपयोगात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.