भाजपसाठी जुळून आली समीकरणे… पालघरमध्ये डॉ. हेमंत सावरांना विजयाची संधी

भाजपसाठी जुळून आली समीकरणे… पालघरमध्ये डॉ. हेमंत सावरांना विजयाची संधी

2018 ची पालघरची लोकसभेची पोटनिवडणूक. भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) या महायुतीतील दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचे दिवंगत खासदार चिंतामणराव वनगा यांच्या पुत्राला शिवसेनेत घेतले. श्रीनिवास वनगा धनुष्य-बाण चिन्हावर उभे होते. तर काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) भाजपचे उमेदवार झाले होते. राज्यात एकत्र सत्तेत असूनही दोन्ही पक्षांनी या निवडणुकीसाठी ताकद पणाला लावली होती. अटीतटीच्या लढतीत भाजपचे राजेंद्र गावित अवघ्या 29 हजारांनी निवडून आले. पण ठाकरेंनी हट्ट सोडला नव्हता. वर्षभरातच लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. ठाकरेंनी अमित शाहंकडून पालघरची जागा आणि उमेदवार दोन्ही मागून घेतला. (BJP candidate Hemant Savara has a chance to win in Palghar Lok Sabha constituency.)

थोडक्यात गत दोन्ही निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची राहिली होती. पण यंदा ठाकरेंनी पालघरमध्ये फारशी ताकद लावल्याचे दिसून आले नाही. ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी या ना फारशा चर्चेत होत्या ना स्पर्धेतही दिसल्या. त्यामुळे इथली निवडणूक ही भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशीच राहिल्याचे बोलले जाते. त्यातही विधानसभानिहाय मतदाराची टक्केवारी बघितल्यास भाजपला विजयाची संधी आहे. हे सर्व मतदान भाजपच्या बाजूने गेले असल्यास हेमंत सावरा यांच्यारुपाने पालघरमध्ये पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलणार हे नक्की…

पण नेमकी काय आहेत ही गणितं… आणि आम्ही असं का म्हणत आहोत… तेच पाहुया…

पालघर लोकसभेचे निम्मे मतदान हे वसई, नालासोपारा आणि बोईसर शहरी भागातील विधानसभा मतदारसंघात आहे. या तिन्ही मतदारसंघांसह वसई-विरार शहरावर आणि इथल्या महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची चांगली पकड आहे. मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर यांनी 51 टक्क्यांहून मते मिळवत इथली निवडणूक जिंकली आहे. 2019 मध्येही लोकसभेचे उमेदवार बळीराम जाधव यांना 51 टक्के मते मिळाली होती. बोईसरमध्ये तर मागच्या तीन टर्म इथून बहुजन विकास आघाडीचेच आमदार निवडून येत आहेत. नालासोपारामध्येही हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर हे तीन टर्मपासून निवडून येत आहेत. पण एवढी मजबूत पकड असूनही याच भागात बहुजन विकास आघाडीची धाकधूक वाढली आहे.

याचे सर्वात पहिले कारण म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत घटलेला मतदानाचा टक्का. नालासोपारामध्ये अवघे 51 टक्के, वसईमध्ये 58 टक्के आणि बोईसरमध्ये 61 टक्के मतदान झाले आहे. यामुळे बविआला लीड मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. दुसरे कारण म्हणजे गुजरातच्या सीमेवर असलेल्या पालघर आणि वसई आणि विरार या भागामध्ये गुजराती जैन समाज मोठ्या प्रमाणावर वसलेला आहे. या मतदारांवर भाजपचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे इथे मोदी कार्डही चालण्याचा अंदाज आहे. तर नालासोपारा क्षेत्रात उत्तर प्रदेशस्त नागरिक मोठ्या संख्येने आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर या भागात झाल्या आहेत.

मुंबईतील मतदान प्रक्रियेवरून राऊतांचा प्रहार! म्हणाले ‘हा’ भाजपचा शेवटचा डाव

तिसरे कारण म्हणजे, हा भाग बहुजन विकास आघाडीचे प्रभावक्षेत्र असला तरीही ही लोकसभेची, अर्थात देशाची निवडणूक असल्याचा मुद्दा भाजपा शिवसेना महायुतीकडून बिबविण्याचा प्रयत्न झाला. चौथे कारण म्हणजे नालासोपारा आणि बोईसर मतदार संघातील सुमारे लाखभर मतदार मतदान यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे याचा फटकाही बहुजन विकास आघाडीला बसण्याचा अंदाज आहे. पाचवे कारण म्हणजे, वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेचाही महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा होता. यातूनही विजयाच्या गणिताचे समीकरण बदलणार आहे. याचाही फायदा हेमंत सावरा यांना होण्याचा अंदाज आहे.

एका बाजूला या शहरी भागात कमी मतदान झालेले असताना ग्रामीण भागात मात्र चांगले मतदान झाले आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त 71 टक्के मतदान झाले आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजप आणि महायुतीची मोठी ताकद आहे. इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील भुसारा अजितदादांसोबत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे इथे भाजपचे विद्यमान उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांचीही वैयक्तिक ताकद आहे. ते 2019 मध्ये इथले महायुतीचे उमेदवार होते. पण दोन नंबरला राहिले होते. 2014 मध्ये त्यांचे वडील विष्णू सावरा हे इथून आमदार होते. 2014 मध्ये लोकसभेला भाजपच्या चिंतामणराव वनगा यांना या मतदारसंघातून 32 हजारांचे लीड मिळाले होते. तर 2009 मध्ये चिंतामणराव वनगा भाजपकडूनच आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना लोकसभेलाही इथून 23 हजारांचे लीड मिळाले होते.

याशिवाय पालघरमधूनही भाजपला मोठे मतदान झाल्याचा अंदाज आहे. इथले विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. इथले माजी आमदार आणि माजी खासदार राजेंद्र गावित पुन्हा भाजपमध्ये गेले आहेत. ते 2009 मध्येही इथूनच काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये त्यांचा अवघ्या 500 मतांनी पराभव झाला होता. 2018 मध्ये ते भाजपचे खासदार बनले. तर 2019 मध्ये शिवसेनेचे खासदार बनले. त्यावेळी त्यांना केवळ पालघरमधूनच तब्बल 61 हजारांचे लीड मिळाले होते. इथले माजी आमदार अमित घोडा हेही आता भाजपसोबतच आहेत.

Ground Report : भारती पवारांना ‘कांदा’ रडवणार? प्रचारापासून भुजबळांचं अंतरही डोकेदुखी

या पाच मतदारसंघांतील समीकरणे भाजपच्या बाजूने असतानाच डहाणू लोकसभा मतदारसंघ मात्र भाजपला काहीसा जड जाण्याची शक्यता आहे. डहाणू हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. इथे सध्या माकपचेच विनोद निकोले हे आमदार आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे इथे किमान 70 ते 80 हजारांचे मतदान आहे. 2019 मध्येही आघाडीतील असलेल्या बहुजन विकास आघाडीला आठ हजारांचे लीड होते. 2014 मध्ये मोदी लाटेत इथून भाजपचे आमदार निवडून आले होते. 2009 मध्ये मात्र इथे कम्युनिस्टचेच आमदार निवडून आले होते. पण गत पंचवार्षिकला डहाणूची नगरपालिका जिंकत भाजपने या भागात आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे इथे भाजप पिछाडीवर राहिली तरी ते अंतर फार नसले असे जाणकार सांगतात.

कामडी यांच्या जमेच्या आणि कुमकवत बाजू कोणत्या?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पहिल्या यादीच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असलेल्या भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांना प्रचाराला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी मिळाला. उद्धव ठाकरे यांनीही जाहीर सभा घेऊन प्रचाराला आरंभ केला होता. पालघर तसेच आसपासच्या परिसरातील वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने दिलेला पाठिंबा, मराठी मते ही कामडी यांची जमेची बाजू मानली जाते. याशिवाय माकपच्या पाठिंब्यामुळे तलासरी, डहाणू परिसरातील अतिरिक्त साथ ठाकरे गटाला मिळेल अशी अपेक्षा आहे.

वसई-विरार मधील ख्रिस्ती आणि मुस्लिम अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणात बहुजन विकास आघाडी सोबत असतो. तर काही समाजवादी ख्रिस्ती प्रभावाच्या पश्चिमेकडील गावांमधून बविआला पूर्वीपासून विरोध करण्यात येतो. हे दोन्ही गट हिंदुत्ववादी संघटना म्हणून भाजपा किंवा मोदी विरोधक आहेत. या समाजावर ख्रिस्ती धर्मगुरूंचा मोठा प्रभाव असतो. निवृत्त धर्मगुरू फादर मायकलजी यांनी तर या निवडणुकीत काही ख्रिस्ती संघटना आणि नेत्यांना सोबत घेऊन कामडी यांच्यासाठी जाहीरपणे प्रचार केला होता.

बहुजन विकास आघाडीने राज्यात शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा दिला आहेत. भविष्यात त्यांचा उमेदवार केंद्रात भाजपाला समर्थन देऊ शकतो. या शक्यतेमुळे आणि बविआला मत म्हणजे भाजपाला मत, असा प्रचार ठाकरे गटाकडून रुजवण्यात आला. त्यामुळे सुमारे सव्वा लाख ख्रिस्ती समाजाचा कौल आणि कल भारती कामडी यांच्याकडे जाऊ शकतो, असा अंदाज आहे. पण पक्ष नेतृत्वाकडून रसद न पुरविल्यामुळे काहीशा नवख्या असलेल्या कामडी संपूर्ण मतदारसंघात पुरेशा पोहोचू शकल्या नाहीत. इथून त्यांच्या बाजूने राज्यातील एकही मोठा नेता नव्हता. त्यामुळे कामाडी यांना ठाकरे यांच्याच नावावर मतांची मागणी करावी लागली. लोकांपुढे ठाकरेंशिवाय स्थानिक बडा चेहरा नसल्याने ही निवडणूक कामडी यांना जड जाण्याची शक्यता अधिक आहे.

थोडक्यात मतदारसंघातील डहाणू वगळता इतर ठिकाणची परिस्थिती भाजपच्या बाजूने दिसून येते. त्यामुळेच भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांना यंदा विजयाची संधी आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार आहे. आता चार जून रोजी नेमका काय निकाल लागतो हे कळूनच येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube