Ground Report : भारती पवारांना ‘कांदा’ रडवणार? प्रचारापासून भुजबळांचं अंतरही डोकेदुखी
मोदी सरकारच्या कांदा धोरणामुळे देशात कांद्याचे दर स्थिर राहिले. निवडणुकीच्या तोंडावर दर न वाढल्याने सरकारला सर्वसामान्य जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला नाही. पण याच धोरणाचा बुमरँग कुठे झाला असेल तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात. नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. याच मतदारसंघात ‘लासलगाव’ ही देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. त्यामुळेच दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार आणि एकूणच भाजप पक्षाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
संपूर्ण प्रचारादरम्यान, भारती पवार यांना शेतकऱ्यांचा हा रोष पाहायला मिळाला. कुठे जाहीर सभेत त्यांना शेतकऱ्यांनी भाषण करण्यापासून रोखले. तर कुठे शेतकऱ्यांनी त्यांना कांद्याच्या प्रश्नावरुन भाषण थांबवून जाब विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतही शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून निदर्शने केली. मतदानादिवशीही ग्रामीण भागात कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदान केंद्रांवर पोहोचले. मतदानानंतर 2014 आणि 2019 मध्ये भाजपला मतदान केलेल्या मतदारांनीही यंदा बदल केले असल्याचे बोलून दाखवले आहे. याचा थेट फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना होण्याची शक्यता आहे.
नेमके काय घडले दिंडोरी लोकसभा मतदारसंघात, पाहूया…
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर दिंडोरी मतदारसंघ भाजपसाठी कमालीचा अनुकूल झाला. नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड आणि दिंडोरी या सहाही विधानसभा क्षेत्रात महायुतीचे वर्चस्व तयार झाले. नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे, कळवणमध्ये नितीन पवार, येवल्यामध्ये छगन भुजबळ, निफाडमध्ये दिलीप बनकर आणि दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर चांदवडमध्ये भाजपचे राहुल आहेर हे आमदार आहेत.
थोडक्यात डिसेंबर 2023 पर्यंत कागदावर तरी हा मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल होता. पण कांद्याचे वाढते भाव पाहुन डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने कांद्याला आधी निर्यात शुल्क लागू केले आणि नंतर थेट निर्यातबंदीच केली. केंद्राच्या या धोरणाचा इथल्या शेतकऱ्यांना कमालीचा फटका बसला. लेट्सअप मराठीने या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा एका एका शेतकऱ्याला थोडा म्हंटल तरी लाखाच्या घरात फटका बसला होता.
बारावीत मुलीच हुशार! राज्याचा निकाल ९३.३७ टक्के, कोकण विभाग ठरला अव्वल
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कांद्यामुळे कमालीचा तोटा झाल्याने शेतकरी बदलाच्या मानसिकतेत आला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांची ही नाराजी हेरली. गतवेळी भारती पवार यांना चांदवड तालुक्यातून तब्बल 80 हजारांचे लीड मिळाले होते. मग शरद पवार हेही चांदवडमध्येच रस्त्यावर उतरले. याशिवाय त्यांनी एका सर्वसामान्य गुरुजींना उमेदवारी देत सामान्यांच्या मनाला हात घातला.
लेट्सअप मराठीला लासलगावच्या बाराजपेठेत भेटलेले शेतकरी चांदवडचेच होते. त्यांनीही यंदा बदल आवश्यक असल्याचे बोलून दाखवले होते.
यामुळे कागदावर सर्व अनुकूल परिस्थिती असलेल्या महायुतीला निवडणूक आव्हानात्मक झाली. अशात भारती पवार यांच्याबद्दलची भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आली. स्वीय सहायकांमार्फत कारभार, पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संपर्काचा अभाव या बाबी पदाधिकारी जाहीरपणे बोलू लागले. याविषयी जाहीर भाष्य करणाऱ्या भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाला ऐन निवडणुकीत पक्षाला निलंबित करणे भाग पडले.
इतर स्थानिक मुद्दे :
जशी कांद्याची परिस्थिती तशीच द्राक्षांचीही स्थिती द्राक्षांची राहिली. सरकारच्या धोरणांमुळे कित्येक दिवस बांग्लादेशमध्ये द्राक्षे निर्यात झाली नाहीत, असे आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केले. याशिवाय पाणी टंचाई, रोजगाराचा अभाव, रेल्वे गाड्यांची पळवापळवी हे मतदार संघातील महत्वाचे प्रश्न मानले जातात. दिंडोरी मतदारसंघातील अनेक भागात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मनमाडसारख्या ठिकाणी 22 दिवसांआड पाणी पुरवठा होतो.
मुख्यमंत्रीपदी ‘एकनाथ शिंदे’ कोणाला नको होते? पवारांचा खुलासा… ठाकरे व्हिलन?
येवला, नांदगाव या तालुक्यांमघ्येही कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती आहे. केंद्रीय आरोग्य खात्याचे मंत्री असलेल्या भारती पवार यांच्या या मतदारसंघातील काही आदिवासी महिला प्रसुती आणि उपचारासाठी शेजारील गुजरातमध्ये जातात ही वस्तुस्थितीही नाकारुन चालणार नाही. भारती पवार यांची डोकेदुखी इथेच थांबली नाही. मतदारसंघातील सर्वात बडे नेते असलेले छगन भुजबळ यांनी प्रचारापासून राखलेले अंतर हा चर्चेचा विषय ठरला.
अजितदादांच्या गटाच्या आमदारांचे प्रचारापासून अंतर :
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक आणि दिंडोरीमध्ये प्रचारापासून राखलेले अंतर मतदारसंघातील कमालीचा चर्चेचा विषय बनला. नाशिक मतदारसंघातून इच्छुक असलेल्या भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आधी तयारी करायला सांगायला लावणे आणि पुन्हा उमेदवारी जाहीर न करणे ही आपली अवहेलना असल्याची भावना त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली. यातूनच ते प्रचारापासून लांब असल्याचे बोलले जाते. पंतप्रधान मोदींच्या सभेत त्यांनी तडफदार भाषण केले असले तरीही त्यांनी दोन्ही मतदारसंघांमध्ये एकही जाहीर सभा घेतली नाही.
नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचा अर्ज भरल्यानंतर ते आठ दिवसांनंतर काही वेळासाठी रॅलीमध्ये दिसले. तर भुजबळ यांचा येवला मतदारसंघ दिंडोरीमध्ये येतो. त्यामुळे या मतदारसंघातही त्यांचे महत्व जास्त आहे. पण अर्ज भरल्यानंतर ते फारसे जाहीरपणे प्रचारात दिसले नाहीत. भारती पवार येवल्यात येऊनही भुजबळ उपस्थित नव्हते. तर त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही रॅली सुरु होताना फोटोपुरते समोर आले आणि पंधराव्या मिनिटाला गायब झाले. याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात अनेक चर्चा रंगल्या.
याशिवाय शिवसेना आमदार सुहास कांदे यांनीही छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी तुतारीचे काम करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भुजबळ बॅकफूटवर फेकले गेले. यावर ते वयाचे अंतर सांगत आहेत. तसेच आपले पदाधिकारी आणि पंकज भुजबळ, समीर भुजबळ हे प्रचारात आहेत, असे ते म्हणतात. या गोष्टी घडत असतानाच आमदार नरझरी झिरवळ हे विरोधी उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ एका बैठकीत सहभागी झाल्याचे समोर आले. त्यामुळे अजित पवार यांची पुन्हा पंचाईत झाली. यावर त्यांना पुन्हा एकदा सारवासारव करावी लागली.
महाविकास आघाडीने मतविभागणी टाळली :
शरद पवार यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांना माघार घ्यायला लावून मतविभागणी टाळली आहे. पूर्वीच्या मालेगाव मतदारसंघातून 1999 मध्ये तर 2004, 2009 आणि 2019 मध्ये दिंडोरी मतदारसंघात माकपच्या बंडखोरीमुळे मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली होती. त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराचा पराभव आणि भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता. पण यंदा भाजपचा पराभव करायचा आहे, या उद्देशाने माकपाने एक पाऊल मागे येण्याचे ठरवले. त्यामुळे पवार यांनी भास्कर भगरे यांच्यासाठी किमान एक लाख मतांची सोय केल्याची चर्चा आहे.
दिंडोरीचा उमेदवार देऊन, पवारांचा मास्टर स्ट्रोक :
गतवेळी भारती पवार यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नव्हते. त्यात यंदा शरद पवार यांनी दिंडोरीचाच उमेदवार दिला आहे. त्यामुळे इथून मताधिक्य मिळविणे भारती पवार यांच्यासमोर आव्हानाच विषय आहे. यंदा दिंडोरीमध्ये मतदानही चांगले झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिंडोरीमध्ये 62 टक्के मतदान झाले होते. शेवटच्या तासात हा आकडा 66 टक्क्यांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.
तर चांदवड, निफाड, कळवण इथला शेतकरी नाराज असल्याने इथून आपल्यालाच मताधिक्य मिळेल असा भगरे यांचा दावा आहे. कळवणमध्येही संध्याकाळपर्यंत 66 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज आहे. तर अन्य ठिकाणी 60 टक्क्यांच्या पुढे मतदान झाले आहे. येवल्यामध्ये राजकीय परिस्थिती दोन्ही उमेदवारांसाठी 50-50 मतदान झाले असण्याची शक्यता आहे.
नांदगावमध्ये मात्र शरद पवार यांच्या पक्षाकडे एखादा बडा नेता नसल्याने तिथून भारती पवार पुढे राहतील असा अंदाज आहे. पण इथले अत्यंत कमी मतदान चिंतेचा विषय बनला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे सध्या तरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे भास्कर भगरे यांचे पारडे जड वाटत आहे. पण महायुतीहीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर वारं फिरले होते असा दावा केला आहे. त्यामुळे दिंडोरीमध्ये नेमके काय होणार हे येत्या चार जूनलाच कळून येणार आहे.