शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तात्काळ जामीन मिळाल्याने पीडित कुटुंब संतप्त
Thane Crime : बदलापूर घटनेची पुनरावृत्ती झाल्याची घटना ठाण्यातून समोर येत आहे. एका अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जामीन दिल्यामुळे जमाव संतप्त झाला होता. पीडित चिमुकलीच्या माता-पित्यांसह ठाण्यातील शेकडो महिला ठिय्या मांडत आक्रोश केला. चिमुकलीसोबत गैरवर्तन करणारा आरोपी शिंदे गटाचा उपविभागप्रमुख आहे. सचिन यादव असं त्याचं नाव आहे.
ठाण्यातील भंडार आळी भागात एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य करण्यात आलं. याप्रकरणात आरोपी शिंदे गटाच्या उपविभागप्रमुखाने सचिन यादव (55) याच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, विनयभंगाच्या आरोपीला जामीन मिळालाच कसा? असा सवाल लाडक्या बहिणींनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर ठाण्यात पीडितेच्या आई-वडिलांसह शेकडो महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. तत्काळ अटक करा, अशी मागणीही केली आहे.
बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याची बिश्नोई गँगने कशी केली निवड?, वरातीतल्या गोळीबाराची खतरनाक कहाणी
ठाण्याच्या स्टेशन परिसरातील भंडार आळीत राहणारी चिमुकली शुक्रवारी दुपारी ट्युशनला जात होती. तेव्हा शिंदे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादव (55) यानं त्या मुलीला इमारतीमध्ये गाठत विनयभंग केला. त्यावेळी घाबरलेल्या पीडित तरुणीनं त्या नराधमाला लांब ढककलं. त्यानंतर संतापलेल्या सचिन यादवनं अश्लील भाषेत भाष्य केलं. पीडित तरुणीनं आपल्यासोबत झालेला प्रकार तात्काळ कुटुंबियांना सांगितला. या घटनेची गंभीर दाखल घेत पीडितेच्या कुटुंबियांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
ही घटना घडल्यानंतर विनयभंग करणाऱ्या आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नराधमाला एकाच दिवसांत जामीन मंजूर होतोच कसा? असं मनसे नेते अविनाश जाधव आणि पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आज पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला पुन्हा अटक करण्याची मागणी केली. नराधम आरोपी शिंदे गटाचा उपविभागप्रमुख असून तो मोकाट फिरत असल्यानं पीडित कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.