मोठी बातमी! आ. संग्राम जगतापांना धमकी देणारा गजाआड, थेट तेलंगणात आवळल्या मुसक्या

Sangram Jagtap : अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (Sangram Jagtap) धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाइलवर टेक्स्ट मेसेज करून धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी या आरोपीला थेट तेलंगणातून ताब्यात घेतलं आहे. आमदार जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी शहरातील राजकीय आणि सामाजिक संघटनांनी केली होती. पोलिसांनीही या घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला होता. पोलिसांनी तपास करत या धमकी बहाद्दराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाइलवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेजमध्ये ‘संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा’ असा मजकूर लिहिलेला होता. संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. हिंदू समाजाची बाजू आमदार जगताप अतिशय हिरीरीने मांडत आहेत. अशातच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. संग्राम जगताप यांच्या या भूमिकेमुळेच त्यांना अशी धमकी दिली गेली का हा प्रश्न निर्माण झाला होता.
“‘त्या’ लोकांचे विचार ठेचून काढणार, महाराष्ट्रात..” आ. संग्राम जगतापांनी काय सांगितलं?
धमकी देणाऱ्याला अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी केली होती. या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे हा मुद्दा अधिक संवेदनशील झाला होता. पोलिसांनीही या घटनेचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी तत्काळ तपास सुरू केला. तांत्रिक तपास केला आणि या धमकी देणाऱ्याला थेट तेलंगणातून अटक करण्यात आली. आता या धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता याची माहिती पोलीस तपासातून समोर येईल.
धमकीला जास्त महत्व देण्याची गरज नाही : जगताप
या धमकी प्रकरणाबाबत विचारले असता जगताप म्हणाले, मी सध्या अधिवेशनात आहे. त्यामुळे या धमकीच्या प्रकाराबाबत मी फार काही माहिती घेतलेली नाही. पण या प्रकाराला फार महत्व देण्याची गरज मला वाटत नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला इतकीच माहिती मला मिळाली. त्यानंतर माध्यमांत आलेली माहिती मी घेतली. पण याला फार महत्व द्यावं असं मला वाटत नाही असे संग्राम जगताप यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल