“‘त्या’ लोकांचे विचार ठेचून काढणार, महाराष्ट्रात..” आ. संग्राम जगतापांनी काय सांगितलं?

Sangram Jagtap : अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना दोन दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे. थेट जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत मजल जाते त्यामुळे नागरिकांतून अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. यातच आता या प्रकरणावर आमदार संग्राम जगताप यांनी भाष्य केलं आहे. या प्रकाराला जास्त महत्व देण्याची गरज मला वाटत नाही, असे आमदार जगताप लेट्सअप मराठीशी बोलताना म्हणाले आहेत.
या धमकी प्रकरणाबाबत विचारले असता जगताप म्हणाले, मी सध्या अधिवेशनात आहे. त्यामुळे या धमकीच्या प्रकाराबाबत मी फार काही माहिती घेतलेली नाही. पण या प्रकाराला फार महत्व देण्याची गरज मला वाटत नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला इतकीच माहिती मला मिळाली. त्यानंतर माध्यमांत आलेली माहिती मी घेतली. पण याला फार महत्व द्यावं असं मला वाटत नाही.
संविधानाचं रक्षण करणं हेच आमचं काम
थेट लोकप्रतिनिधीला जीवे मारण्याची धमकी देणे इतकी हिंमत वाढते कशी असे विचारले असता जगताप म्हणाले, महाराष्ट्र आणि देशात एक विचार असा आहे जो संविधान मानत नाही त्याला सीरियाचा कायदा मान्य असतो. महाराष्ट्रात आम्ही या सीरियाच्या विचारांना कदापि डोके वर काढू देणार नाही. संविधानाचं रक्षण करणं हेच आमचं काम आहे. जे लोकं संविधान मानत नाहीत त्यांना संविधान मानायला लावणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या गोष्टीवर आम्ही ठाम राहू.
ज्यावेळी आमचे वारकरी बंधू पुण्यातून पायी प्रवास करत होते त्यावेळी त्यांच्या अंगावर मांस आणि मासे टाकण्याचा प्रयत्न झाला. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातही वारी परत गेली पाहिजे यासाठी भीतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. संविधान न मानणारे भारताचा तिरंगा न मानणारे हे जे लोकं आहेत हेच लोकं या सगळ्या घटना करताना पाहायला मिळतात. त्यामुळे हा विचार ठेचून काढण्याचं काम आता करावं लागणार आहे.
पालकमंत्र्यांचं काम बेस्ट
नगर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. यात पालकमंत्री कुठेतरी कमी पडत आहेत असे तुम्हाला वाटते का? असे विचारले असता पोलीस यंत्रणेला माहिती नसतं की गुन्हेगार काय गुन्हा करणार आहे. पण ज्यावेळी गुन्हा घडतो त्यावेळी क्राईम डिटेक्शन हा महत्वाचा भाग असतो. गुन्हा घडल्यानंतर आरोपीला शोधून काढणं जास्त महत्वाचं असतं. तशा प्रकारची मोहिम आमचे पालकमंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) करतात असे त्यांनी स्पष्ट केले.
“एखाद्याचं वक्तव्य ही पक्षाची भूमिका नाही” अजितदादांनी सांगितलं संग्राम जगतापांच्या भेटीत काय घडलं?
गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
आम्ही देखील गोशाळा चालवतो. गोवंश हत्याबंदीचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता याबाबतीत कुठेतरी पुढाकार घेतलाच पाहिजे. गोहत्या आणि गोवंश हत्या करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केली.