निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना ‘सुट्टी’ : राज ठाकरेंच्या मागणीची आयोगाकडून दोन दिवसांत दखल

निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना ‘सुट्टी’ : राज ठाकरेंच्या मागणीची आयोगाकडून दोन दिवसांत दखल

मुंबई : मुंबईमधील सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून अखेर सुट्टी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांच्या सुचनेनंतर अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहे. मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करावे, अशी मागणी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. त्या मागणीची आयोगाने अवघ्या दोन दिवसांत दखल घेतली आहे. (All the teachers in Mumbai have finally been freed from election duty)

शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची कैफियत घेऊन दोन दिवसांपूर्वी शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवून ठेवणे चुकीचे असल्याचे म्हंटले होते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही निवडणूक आयुक्तांशी चर्चा करू, आयोगाला जाब विचारु, असे म्हणत, शिक्षकांनी कुठेही निवडणूक कार्यक्रमाला रुजू होऊ नये, मुलांकडे लक्ष द्यावे, कोण काय कारवाई करते, त्याकडे मी पाहतो, असे आयोगालाच आव्हान दिले होते.

Manohar Joshi : शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं, बाळासाहेबांचं स्वप्न पू्र्ण झालं; दिग्गजांकडून आठवणींना उजाळा

ठाकरे म्हणाले होते, मुंबई महापालिका क्षेत्रात चार हजार 136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यात आले आहे. हे किती काळासाठी? हे शिक्षक जर निवडणुकांमध्ये व्यस्त असतील तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? ह्याबाबतीत कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. निवडणुकांच्या कामासाठी मनुष्यबळ कमी पडते तर निवडणूक आयोग पाच वर्षे काय करतो? प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणुका येतात मग तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का? किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. प्रत्येकवेळा नवे काहीतरी आणायचं आणि वाद ओढावून घ्यायचा.

साधा शिवसैनिक, सिव्हिल इंजिनिअर ते शिवसेनेचा पहिला CM; जोशींचं राजकारण बाळासाहेबांनी घडवलं

आयोगाने, महापालिकेने असे आदेश दिले आहेत कि जे शिक्षक निवडणुकीच्या कामात सहभागी होणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांना घडवणे हे शिक्षकांचे काम आहे, निवडणुकीची तयारी करणे हे त्यांचे काम नाही. महिनोंमहिने शिक्षकांना कामाला लावण्यापेक्षा नवीन लोक सेवेत घ्यावे, त्यांना प्रशिक्षण द्यावे, न्यायालयानेही सांगितले की, निवडणुकांच्या काही ठराविक 7 ते 8 दिवसांसाठी शिक्षकांची मदत घेतली तर समजू शकतो. पण महिनोंमहिने त्यांनी का राबायचे? विद्यार्थ्यांचे नुकसान का होऊ द्यायचे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही निवडणूक आयुक्तांशी चर्चा करू, आयोगाला जाब विचारू. माझी शिक्षकांना विनंती आहे की, त्यांनी कुठेही निवडणूक कार्यक्रमाला रुजू होऊ नये, मुलांकडे लक्ष द्यावं, कोण काय कारवाई करते, त्याकडे मी पाहतो, असे आव्हान त्यांनी दिले होते.

हा प्रश्न राज्यातील शिक्षकांशी संबंधित :

आमदार सत्यजीत तांबे यांनी केवळ मुंबईतीलच नाही तर राज्यातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले,  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु हा प्रश्न फक्त मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्व शिक्षकांना निवडणूक व अन्य शाळाबाह्य कामांमधून वगळण्यात यावे, अशी विनंती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज