सिद्दीकींच्या घराची रेकी अन् ऑफिसबाहेर पाळत अन्.. पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय?
Baba Siddiqui Shot Dead News Update : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना लागलीच अटक केली. यातील एकजण हरियाणाचा तर दुसरा उत्तर प्रदेशातील आहे. या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. या चौकशीत या संशयितांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या दोघांना आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
मागील दीड ते दोन महिन्यांपासून आरोपींनी बाबा सिद्दीकींचं घर आणि त्यांच्या कार्यालयाची रेकी केली होती. दीड ते दोन महिन्यांपासून त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने वृत्तात म्हटले आहे.
सिद्दीकींची हत्या नेमकी कशी झाली?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट अनेक दिवसांपासून तयार केला जात होता. सिद्दीकी यांना ठार करण्याचा प्लॅन फायनल झाला. त्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळी दाखल झाले. बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी रात्री 9 वाजेपर्यंत खेरवाडी स्थित कार्यालयातच होते. यानंतर साधारण साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दोघेही बरोबरच घरी जाणार होते. मात्र जीशान सिद्दीकी आधी खेरवाडीला जाण्यासाठी निघाले.
जीशान सिद्दीकी गेल्यानंतर पाच मिनिटांनी बाबा सिद्दीकी देखील नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत कार्यालयाबाहेर पडले. आता असे सांगण्यात येत आहे की बाबा सिद्दीकी यांची कार शंभर मीटर अंतरावर उभी होती. या दरम्यान लोकांना भेटत असताना काहीतरी फुटल्याचा मोठा आवाज झाला.
फटाके फुटले असावेत असा कार्यकर्त्यांचा समज झाला. परंतु, आजूबाजूला कोणताच उत्सव सुरू नव्हता. त्यामुळे वेगळंच काहीतरी घडतंय याचा संशय बळावला. त्याचवेळी काहीतरी स्फोट होऊन धूर निघाला आणि तितक्या गोळीबाराचा आवाज आला. यानंतर कार्यकर्ते कारच्या जवळ पोहोचले त्यावेळी तीन लोक पळून जाताना त्यांना दिसले. दुसरीकडे बाबा सिद्दीकी मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
पंधरा दिवसांपूर्वी धमकी, फटाक्यांचे आवाज अन् धाडधाड… बाबा सिद्दीकींची हत्या कशी झाली?
घड्याळ दुरुस्तीतून राजकारणात
बाबा सिद्दीकींचं पूर्ण नाव बाबा झियाउद्दीन सिद्दीकी असे होते. ते मुळचे बिहारचे रहिवासी होते. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1956 रोजी झाला होता. वडिलांबरोबर ते स्वतः घड्याळ दुरुस्ती करायचे. याच काळात त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून राजकारणालाही सुरुवात केली होती. बीएमसीमध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सन 1977 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना एनएसयूआयमध्ये प्रवेश केला. 1980 मध्ये वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस, 1982 मध्ये वांद्रे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि 1988 मध्ये मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
हेही वाचा :
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा; मध्यरात्री सलमान खान लीलावती रुग्णालयात दाखल
Baba Siddiqui Death : मोठी बातमी! बाबा सिद्दीकींची गोळी झाडून हत्या