धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांनीही घेतली आक्रमक भूमिका
Demand for Dhananjay Munde Resignation :संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Dhananjay Munde ) वादात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे. मात्र, भाजप नेत्यांची कृती लक्षात घेता पक्ष मुंडे यांच्याबाबत फार काही अनुकूल नसल्याचे नसून राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. भाजपचे आमदार सुरेश धसदेखील मुंडे यांच्या हकालपट्टीची सातत्याने मागणी करीत आहेत. ते रोज नवे आरोप करत असताना भाजपने त्यांना आवरलेले दिसत नाही. धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप करीत असताना भाजपकडून धस यांना मोकळीक कशी दिली जाते, असा सवाल केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे की बीडचं…संजय राऊत यांचा देशमुख हत्येवरून घणाघात
बीडमधील गुंडगिरीविरोधात आवाज उठविणाऱ्या अंजली दमानिया यांना धमक्या आल्या असता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी पोलिसात धाव घेतली. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या दमानिया यांच्या मदतीला भाजपच्या आमदार धावून गेल्याचे यामुळे दिसले. दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्याबद्दल अजित पवार गटाकडून संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड, हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावा, या मागणीसह धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात वातावरण तापलेलं आहे. शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपालांचीही भेट घेतली आहे.