मोहिते पाटील अन् रामराजेंचा विरोध… निंबाळकर आता विजयाचे गणित कसे सोडवणार?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मोहिते पाटील घराण्याच्या मदतीमुळे रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांची माढा (Madha) लोकसभा मतदारसंघातून संसदेची वाट सुकर झाली होती, त्याच मोहिते पाटील घराण्याचा यंदा रणजीतसिंह यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता. त्यांच्या जोडीला गतवर्षी रणजीतसिंहांचे कडवट विरोधक असलेले रामराजे नाईक निंबाळकर आले. सांगोल्यातून माजी आमदार दीपक साळुंखेही दबक्या आवाजात विरोध करत होते. पण या सगळ्यांचा विरोध झुगारुन भाजपने माढ्यातून पुन्हा एकदा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. त्यामुळे आता निंबाळकर विजयाचे गणित कसे सोडवणार? पाहुयात याबाबत सविस्तर
जुना पंढरपूर मतदारसंघ जाऊन 2009 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ मिळून एकत्रित माढा हा मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघात प्रामुख्याने प्रभाव आहे तो मोहिते पाटील घराण्याचा. मोहिते पाटील जिथे सत्ता तिथे असे साधारण या भागातील मागील चार ते पाच दशकांपासूनचे समीकरण राहिले आहे. 2019 मध्येही याचाच अनुभव आला.
“राजकारणात काहीही होऊ शकते” : लंकेंचे सूचक विधान, पुण्यात पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश?
लोकसभेला काही दिवसच बाकी असताना संपूर्ण मोहिते पाटील घराणे आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर भाजपमध्ये आले. निंबाळकरांनी मोहिते पाटील घराण्यासोबत एकदिलाने काम केले. त्याचा परिणाम म्हणून मोहिते पाटील यांच्या माळशिरसच्या बालेकिल्ल्यातून निंबाळकरांना एक लाखांचे निर्णायक मताधिक्य मिळाले. याच मताधिक्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र सुरुवातीला मधुर असणाऱ्या या संबंधांमध्ये काहीच दिवसांत मिठाचा खडा पडला. निंबाळकर यांनी ज्येष्ठतेनुसार मोहिते-पाटील यांच्याशी जुळवून न घेता पंगा घेतल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात. त्यातही निंबाळकर यांनी मोहिते-पाटील विरोधकांशी जवळीक वाढविली. त्यामुळे मोहिते पाटील घराण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध वाढला होता. त्यातूनच गतवर्षी पाडव्याचा मुहूर्त साधून भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.
दुसऱ्या बाजूला रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. दोघांचे अर्धा टक्काही जमत नाही. रणजितसिंह आधी काँग्रेसमध्ये होते, तर रामराजे राष्ट्रवादीमध्ये. मात्र दोघांमधून विस्तवही जात नव्हता. रणजीतसिंह निंबाळकर यांच्या तीन पिढ्या माझ्यावर आरोप करत आल्या आहेत. रणजीतसिंहांनी मला खूप त्रास दिला आहे, असे आरोप रामराजे जाहिररित्या आजही करतात. अशात रामराजे निंबाळकरांनी अजितदादांसोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला आणि ते भाजपच्या पंगतीत येऊन बसले. रामराजे निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. मतदारसंघातील फलटण आणि माण-खटाव या पट्ट्यात रामराजे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे मत इथला निकाल बदलवू शकतो.
“एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी होऊ शकतो पण, शरद पवार”… जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
मोहिते पाटलांचा रणजीतसिंहाना विरोध आहे हे ओळखून जुन्या गोष्टी विसरत रामराजेंनीही मोहिते पाटलांची साथ देत रणजीतसिंहांच्या उमेदवारीस जोरदार विरोध केला. जाहीरपणे उमेदवारीला विरोध करणारे मेळावे घ्यायला सुरुवात केली. त्यांना तिकीट मिळू देणार नसल्याचे सभांमधून सांगू लागले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी प्रयत्न करु लागले. त्यांच्या जोडीला सांगोल्यातून माजी आमदार दीपक साळुंखेही दबक्या आवाजात विरोध करत होते. पण या सगळ्यांचा विरोध झुगारुन भाजपने माढ्यातून पुन्हा एकदा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. गतवेळी माळशिरसच्या मताधिक्याने रणजीतसिंहांची वाट सोपी झाली होती. पण आता ते कुठून विजयाचे गणित साधणार? हा सवाल उरतोच.
पण या सवालाचे उत्तर रणजीतसिंह यांनीही शोधून ठेवल्याचे दिसून येते. रामराजे आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्र येत आहेत हे ओळखून रणजीतसिंह निंबाळकर यांनीही माढा मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली होती. अजित पवार राज्यातील सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे उघडपणे रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देत आहेत. तर 2019 मध्ये ज्या संजय शिंदे यांनी निंबाळकरांविरोधात निवडणूक लढविली होती त्या शिंदेंनी निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे करमाळ्यातूनही रणजीतसिंहांसाठी वाट सुकर झाली आहे. सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील आणि माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे देखील निंबाळकरांच्या मागे आहेत. त्यामुळे आता माळशिरस आणि फलटणचे टेन्शन असले तरीही माण, खटाव, माढा, करमाळा, सांगोला या मतदारसंघांमधून रणजीतसिंहांना त्यांची वाट सोपी करता येऊ शकते.