डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा करणार : कृषिमंंत्री कोकाटेंची घोषणा

Mumbai News : हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ.एमएस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस राज्य शासनाच्यावतीने “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. येत्या 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या त्यांच्या 100 व्या जयंतीच्या औचित्याने कृषी क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कार्य कर्तृत्वाला अभिवादन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली.
डॉ. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, शाश्वत शेती, हवामान अनुकूल, महिला शेतकरी इत्यादी बाबींतील विशेष कार्य विचारात घेऊन त्याअनुषंगाने शाश्वत शेती दिन राज्य /जिल्हा / तालुकास्तरावर साजरा करणे, विद्यापीठ स्तरावर साजरा करणे, भारतरत्न डॉ. एमएस स्वामिनाथन यांच्या नावे पुरस्कार देणे, इत्यादी बाबींसंदर्भात कृषी आयुक्तलयाच्यावतीने शाश्वत शेती दिन साजरा करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.
प्रत्येक कृषी विद्यापीठाने शाश्वत शेती, हवामान अनुकूल तंत्रज्ञान व अन्न सुरक्षा या संदर्भातील एक स्वंतत्र विषय निवडून विद्यापीठांतर्गत “डॉ. एमएस स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर-संशोधन केंद्र” स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. या माध्यमातून कृषी क्षेत्रात आणखी सुधारणा घडवण्याचा उद्देश राज्य सरकारचा आहे.
मोठी बातमी! आता शेतीत दरवर्षी 5 हजार कोटींची भांडवली गुंतवणूक; कृषिमंत्री कोकाटेंची घोषणा
कृषीत दरवर्षी पाच हजार कोटींची गुंतवणूक
राज्य सरकारने शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुरळीत व्हावे या उद्देशाने सहा महिन्यात 50 महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. आताही शेतीत दर वर्षाला पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या भांडवली गुंतवणुकीत कांदा चाळ, साठवणगृहे, नवीन तंत्रज्ञान यांसारख्या आवश्यक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत एक धोरण जाहीर करण्यात आले आह. याचा शासन निर्णय येत्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल.