भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना धक्का; पक्षाने बजावली कारण दाखवा नोटीस

  • Written By: Published:
भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना धक्का; पक्षाने बजावली कारण दाखवा नोटीस

BJP notice to Ranjitsinh Mohite Patil : भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर लोकसभेसोबतच (BJP) विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यंदाच्या विधानसभा निकालात भाजपाने १३२ जागा जिंकत इतिहास घडवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून जाणारे आणि पक्षात राहून विरोधकांचा प्रचार करणारे यांची कोंडी झाली आहे.

रणजितसिंह मोहितेंनी भाजप विरोधात काम केले, त्यांची हकालपट्टी करा, राम सातपुतेंचा गंभीर आरोप

सोलापूरातील रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी करावी अशी मागणी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी पक्षाकडे केली होती. लोकसभेत आणि विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटलांनी पक्षाविरोधी काम केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आज भाजपाने मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस पाठवली त्यात पक्षशिस्त भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले आहे.

नोटीसमध्ये काय आहे ?

१) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचारसभेसाठी माळशिरस येथे आले असता सदर कार्यक्रमास आपली अनुपस्थिती होती.

२) लोकसभा निवडणूक काळात आपल्या परिवाराने भाजपाच्या विरोधात काम केल्याचे निदर्शनास आले.

३) पत्रकार परिषदेत आपल्या परिवारातील सदस्यांनी भाजपाच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केले.

४) आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या बूथ प्रमुखांना धमकावणे, पोलिंग एजेंट मिळू न देणे असे प्रकार केल्याचे निदर्शनास आले.

५) लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजपाविरोधी मतदानस प्रवृत्त केल्याचं निदर्शनास आले आहे.

६) विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या परिवारातील सदस्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपाविरोधी काम केल्याचे निदर्शनास आले.

७) महायुतीच्या सरकारने ज्या शंकर सहकारी कारखाना आर्थिक मदत केली त्याच कारखान्यातील चिटबॉयकडून आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रचार केला तसेच कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडल्याचे निदर्शनास आले

८) पोलिंग एजंटला आपल्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

वरील सर्व विषय अतिशय गंभीर असून यावर आपले स्पष्टीकरण असल्यास पुढील ७ दिवसांत लेखी स्वरुपात सादर करावे असं भाजपाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात तिकीट न मिळाल्याने भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यात विशेषत: माढा, माळशिरस, अकलूज या पट्ट्यात मोहिते पाटील घराण्याचं राजकीय वर्चस्व आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीमुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह इतरांनी शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उघडपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. पण स्थानिक पातळीवर रणजितसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी होते. आता नोटीसाला ते काय उत्तर देतात हे पाहण महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube