धडा शिकवणार अन्…, हर्षवर्धन पाटलांना भाजपचा इशारा, पत्र व्हायरल
Harshvardhan Patil : भाजपने गेल्या पाच वर्षात ज्यांना भरभरून दिले ते जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला पण स्वार्थी नेत्याना धडा शिकविण्यासाठी आणि अशा नेत्याना अद्दल घडविण्यास जनता सज्ज असल्याची टीका भाजपा महाराष्ट्र राज्य प्रभारी नवनाथ पडळकर (Navnath Padalkar) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे इंदापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर भाजपा महाराष्ट्र राज्य प्रभारी नवनाथ पडळकर यांचं पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रामध्ये त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना गेल्या पाच वर्षात भाजपने भरभरून दिले मात्र त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला पण हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या स्वार्थी नेत्याना धडा शिकविण्यासाठी आणि अशा नेत्याना अद्दल घडविण्यास जनता सज्ज अशी टीका केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीने गेल्या 5 वर्षात ज्यांना भरभरून दिले ते जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पण इंदापूरमधील मतदार सर्व जाणता आहे. राज्यातील व देशातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामाची जान असल्यामुळे सर्वसामान्य इंदापूरकर भाजपासोबत राहणार आहे आणि भाजपा देखील इंदापूरकरांच्या कायम सोबत राहणार आहेत.
खोबरे तिकडे चांगभलं, अशी राजकीय वाटचाल करणाऱ्या नेत्यांमुळे पक्षाचे काम कधीच थांबत नाही. त्यामुळे इंदापूरमध्ये भाजप येत्या काळात मजबूत होणार आहे. खरं तर या नेत्याला भाजपाने 30 हजार कोटी उलाढाल असलेल्या राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदाची संधी दिली, त्यांच्या स्वतःच्या ताब्यातील साखर कारखान्याला 300 कोटी रुपयांचे पॅकेज दिले. एके काळी त्याना सुखाची झोप लागत नव्हती, तेव्हा भाजपने यांना भरभरून दिले. त्यानीच आता भाजपाला रामराम केला. पण इंदापूरची जनता अशा संधीसाधू नेत्यांना त्यांची जागा दाखवेल आणि एक दिवस याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुणी भाजपची साथ सोडली म्हणून भाजप संपणार नाही. तिथे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये भाजपने केलेली विकास कामांची जाणीव ठेवून जनता भाजपाच्या सोबत राहील आणि भाजपा देखील समस्त इंदापूरकरांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि इंदापूरचा सर्वांगिण विकास घडविण्यासाठी नेहमी पाठबळ देईल. त्यांच्या इंदापूर तालुक्यातील निरा भिमा सहकारी साखर कारखाना आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना या दोन साखर कारखान्यांना केंद्राकडून 300 कोटी रुपये पॅकेज दिले. तसेच पक्षाने इंदापूरमधून विधानसभेची 2019 ला उमेदवारी दिली.
बंद पाडलेला इंदापूरचा दूध संघ मदत करून सुरू करून दिला. त्यास अमूल एजन्सी दिली. एनसीडीसी या राष्ट्रीय वित्त संस्थेचे संचालक बनविले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य केले. संपूर्ण इंदापूर तालुका भाजप पार्टी त्यांच्या स्वाधीन केली. विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली. महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीत सन्मानाचे स्थान दिले. त्यांच्या मुलीला युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष केले. शिक्षण संस्थांना ताकद दिली. यामुळे त्यांना 5 वर्षे शांत झोप मिळाली.
आमचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी पडीक नेत्याला दिल्लीपर्यंत नेवून सुपिक केले आणि सन्मान केला. असा हा नेता क्षुल्लक स्वार्थापायी शरद पवारांच्या नादाला लागून उपकाराची जाणीव विसरला. जो व्यक्ती एवढे देणाऱ्याचा झाला नाही, तो शरद पवारांचा आणि इंदापूरकरांचा तरी कसा होईल. त्यांनी इंदापूर तालुक्यात भाजपा कधीच वाढविली नाही उलट खच्ची केली. फक्त स्वतःचा गट टिकविला. पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला दुय्यम वागणूक दिली. म्हणून अशा गद्दार वॄत्तीला इंदापूर तालुक्यातील गावागावातील कार्यकर्ता व नागरिक मतदार बंधू भगिनी जागोजागी जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.
रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ, HIBOX घोटाळा प्रकरणी पोलिसांनी बजावली नोटीस
सर्वप्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी हा भाजपाचा पक्षमंत्र पाटील कधीच समजू शकले नाहीत. म्हणून ते कृतघ्न आहेत. या अनुषंगाने लवकरच इंदापूर तालुका भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेवून गाव संपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामधून पहिल्यापेक्षा ताकदीने पक्षाची बांधणी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात भाजपाचे संघटन मजबूत करण्यार आणि स्वार्थी नेत्याला अद्दल घडविणार. असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.