संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; असंख्य पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश

Ajit Pawar : बुलढाणा आणि संभाजीनगर येथील विविध पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाहीर प्रवेश केला. यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिवसेनेचे (Shivsena) माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सिदलंबे, खुलताबाद तालुक्यातील कन्नड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ खोसरे, कॉंग्रेसच्या नेत्या शोभा खोसरे, खुलताबाद शहरातील माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन जहीरोद्दीन, माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरेशी, बिपीन बारगळ, मुनीबोद्दीन शेख, दिलीप बावीस्कर, मकसुद पटेल, वैजापूर तालुक्यातील माजी उपनगराध्यक्ष शेख अकील शेख गफूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख रियाज शेख अकील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शेख इरफान शेख गणी, विधी तज्ज्ञ राफे हसन पिरजादा, उबाठा गटाचे माजी शहराध्यक्ष अल्ताफ बाबा, एम आय एम चे तालुकाध्यक्ष अकील कुरेशी, आदींसह इतर पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार मनोज कायंदे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार दिलीप सानंदा, माजी आमदार वसंत शिंदे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाजीर काझी, छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष अभिजीत देशमुख, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांनी आपण पुढे जात आहोत. कुणाच्याबाबतीत भेदभाव न करता सर्व समाजघटकांतील विद्यार्थी, युवक, युवतींना दर्जेदार शिक्षण देण्याची भूमिका आमच्या पक्षाची राहिली आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडले. सर्वधर्मसमभाव हाच विचार करत, सर्व घटकांना पक्षाशी जोडून राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. आता जातनिहाय जनगणना होणार असून सन 2029 मध्ये निवडणूका होतील त्यावेळी कुणाची जातसंख्या जास्त आहे हे समोर येणार आहे असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
ग्रामीण भागाबरोबर शहरीकरणातील कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांनाही आपण त्यांच्यासाठी काम करतोय हे दिसले पाहिजे. सगळ्या जाती – धर्मासाठी पक्ष काम करतोय हेही समजले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. विरोधकांकडे कसलाच मुद्दा नसल्याने मग मराठीचा मुद्दा काढला जातोय याशिवाय असे अनेक विषय काढले जात आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे विषय असतात हेही आवर्जून अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अहान पांडेच्या ‘सैयारा’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; प्रक्षेकांचा जबरदस्त प्रतिसाद
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेंबरकडे होण्याची दाट शक्यता आहे असे अजित पवार यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले शिवाय त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी कामाला लागा असे आवाहनही केले.