ज्यांचा जीव गेला ते कुणाचेतरी मुलंच होते, पुणे अपघात प्रकरणात कुणाला माफी नाही -मुख्यमंत्री
Pune Porsche accident : पुण्यातील हिट अँड रन हे प्रकरण सध्या देशभरात गाजतय. कल्याणीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी पोर्श कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपी अल्पवयीन मुलगा, वडील यांच्यासह सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर काही तासांमध्येच अल्पवयीन आरोपी मुलास जामीन दिला गेला. त्यानंतर देशभरात एकच संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; अल्पवयीन मुलाच्या आजोबांना अटक
बालसुधारगृहात रवानगी
शेवटी नागरिकांच्या संतापाची दखल घेत सरकार कामाला लागलं. पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा बाल न्याय मंडळासमोर अर्ज केला. त्यानंतर अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करत 14 दिवसांसाठी आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
लोकांना मारण्याच लायसन्स नाही
सध्या ज्या ठिकाणी अनधिकृत पब, बार चालू आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे असं म्हणत तसे आदेश पोलीस विभागाला दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसंच, पुण्यात जी घटना घडली त्यातील कुणालाच सोडलं जाणार नाही. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच. कारण ज्या मुलांचा जीव गेला ते मुलंही कुठल्यातरी आई-वडिलांचे मुल आहेत. त्यामुळे यामध्ये गरिब-श्रीमंत असा दुजाभाव केला जाणार नाही. सर्वांना कायदा समान आहे. कुणाला काही लायसन्स दिलं नाही रस्त्यावर लोकांना मारण्याचं असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
फडणवीसांनी उल्लेख केलेला राजकीय दबाव नेमका कुणाचा? पुणे अपघातप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल
गरिब-श्रीमंत असं पाहिलं जाणार नाही
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी पब, बार चालतात त्यांनी जर नियमात चालवले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होणार. त्यांच काही ऐकलं जाणार नाही. तसंच, यामध्ये कोण गरिब-श्रीमंत असं पाहिलं जाणार नाही. ठरवलेला नियम तोडला की त्यावर कारवाई करावी असे सक्त आदेश पोलीस विभागाला दिले आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.