एकही आरोपी सुटता कामा नये, दयामाया दाखवू नका; CM फडणवीसांचा अधिकाऱ्यांना फोन
Devendra Fadnavis : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येला ३५ दिवस उलटून गेले तरीही एक आरोपी अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) वगळता इतर आरोपींवर मोक्काचा (MCOCA) गुन्हा दाखल झाला. कराडवर कारवाई व्हावी यासाठी विरोधक आंदोलन करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केल्याचे वृत्त आहे.
एकही आरोपी सुटता कामा नये, दयामाया दाखवू नका; CM फडणवीसांचा अधिकाऱ्यांना फोन
एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना आणि तपास यंत्रणांबद्दल अविश्वास व्यक्त करत त्यांनी हे आंदोलन केलं. चार तासांनंतर त्यांचे हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी त्यांच्या या आंदोलनामुळं आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील गुन्हेगारांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सरपंच हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये. कोणावरही दयामाया दाखवू नका. आरोपींवर कठोर कारवाई करा, अशा सूचना फडणवीसांना अधिकाऱ्याना फोनवर दिल्यात.
Video : संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मुंडेंच्या घरी कराड अन् पोलिसांची बैठक; सोनावणेंचा गौप्यस्फोट
फडणवीस आणि अजितदादांनी कठोर भूमिका घ्यावी…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता गुळगुळीत मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही. शिवाय गुन्हेगारापेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल हेही लक्षात असू द्या, असं रोहित पवार म्हणाले.
विष्णू चाटेला १४ दिवसांचा कोठडी…
दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने विष्णू चाटेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केज कोर्टाने विष्णू चाटेची दोन दिवसांच्या सीआयडी कोठडीत रवानगी केली होती.
धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असणारा वाल्मिक कराड याच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या पोलिस कोठडीत आहे आणि त्याची कोठडी उद्या संपत आहे. त्यामुळे त्याला उद्या दुपारी केज कोर्टात हजर केले जाईल.