महाराष्ट्रातील लोकांच्या हिताची अन् अधिकाराची लढाई सोबत लढू, राहुल गांधींच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

Rahul Gandhi Best Wishes to Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांत इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं वारंवार बोललं जात आहे. परंतु, अनेकदा ही आघाडी कायम असल्याचंही दिसतं. आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray) यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, महाराष्ट्र युद्धाची लढाई आपण सोबत लढू, अशा शब्दांत शुभेच्छा देत आघाडी बळकट असल्याचे संकेत दिले.
सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना “शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आणि इंडिया आघाडीतील आमचे सहकारी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. उद्धव ठाकरेंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि महाराष्ट्रातील लोकांच्या हिताची आणि अधिकाराची लढाई आपण सोबत लढू,” असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीचा घटकपक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडत असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शुभेच्छा लक्षवेधी आहेत. आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्र हिताची आणि महाराष्ट्रातील लोकांच्या अधिकारांच्या लढाईविषयी बोलून इंडिया आघाडी एकत्र राहण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, असे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं इंडिया आघाडीच्या नेत्यांची ऑनलाईन पद्धतीनं बैठक झाली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, द्रमुक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इत्यादी पक्षांचे नेते यामध्ये सहभागी झाले होते. या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सपाचे रामगोपाल यादव आणि द्रमुकच्या तिरुची शिवा यांचा समावेश होता.