S.T. बँक अडचणीत! आता शिंदे-फडणवीसच गुणरत्न सदावर्तेंचा बाजार उठवणार?

S.T. बँक अडचणीत! आता शिंदे-फडणवीसच गुणरत्न सदावर्तेंचा बाजार उठवणार?

26 जून 2023. ‘डंके की चोट पे’ म्हणत देशातील सर्वात मोठी पगारदार नोकरदारांची बँक अशी ओळख असलेलल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को–ऑप बँकेवर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचे पॅनेल सत्तेत आले. तब्बल 70 वर्षाची परंपरा असलेल्या या बँकेवर पारंपारिक पध्दतीने इंटक आणि कामगार संघटनेची सत्ता होती. मात्र यंदा पहिल्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आणि अवघ्या वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने नवा इतिहास घडवत प्रस्थापित एसटी संघटनाना धूळ चारली. (Cooperation Minister Dilip Valse Patil has ordered an inquiry into ST Bank)

10 नोव्हेंबर 2023. गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघात उभी फूट पडल्याची आणि निवडून आलेल्या 19 पैकी 14 संचालक नॉट रिचेबल झाल्याची बातमी आली. सदावर्तेंच्या बाजूने केवळ पाच संचालक शिल्लक राहिले. 14 बंडखोर संचालकांचे प्रवक्ते आणि जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सदावर्तेंवर अनेक गंभीर आरोप केले. सदावर्तेंची मनमानी, बँकेत स्वतःची आणि नातेवाईकांची नियुक्ती, नियमबाह्य कर्ज वाटप, व्याजदरातील कपात अशा निर्णयांमुळे पाच महिन्यांच्या काळात बँक कशी अडचणीत आली, बँकेवर रिझर्व्ह बँकेने कसे निर्बंध टाकले असा सगळा बँकेचा सातबाराच त्यांनी माध्यमांसमोर मांडाला.

दाऊदच्या हस्तकासोबत ठाकरेंचा शिलेदार; राणेंचे आरोप अन् फडणवीसांनी घोषित केली SIT

सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही याबाबत चर्चा झाली आणि आता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याच सगळ्या घडामोडींमुळे जे सदावर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात तेच आता सदावर्तेंचा बाजार उठवणार का? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. नेमके काय आहे हे प्रकरण, पाच महिन्यांत एसटी बँकेत काय घडले? 14 संचालक सदावर्तेंच्या विरोधात का गेले? देशातील सर्वात मोठी पगारदार नोकरदारांची बँक कशी अडचणीत आली? याच गोष्टींचा घेतलेला हा आढावा…

एस.टी. बँकेला 70 वर्षांची परंपरा :

एसटी महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, त्यांच्या अडीअडचणीला त्यांना कर्ज मिळावे यासाठी 70 वर्षांपूर्वी एस.टी. को. ऑप. बँकेची स्थापना झाली. 70 वर्षांमध्ये बँकेने यशस्वी वाटचाल केली. तब्बल 75 हजार सभासद, राज्यभरात 50 शाखा, 11 विस्तार केंद्रे आणि 2300 कोटींच्या ठेवी एवढे अवाढव्य साम्राज्य विस्तारले. याच बँकेवर जून महिन्यात गुणरत्न सदावर्ते यांची सत्ता आली आणि पाच महिन्यातच या सत्तेला उतरती कळाही लागली. बंडखोर संचालकांच्या आणि मान्यताप्राप्त एस.टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या आरोपांनुसार सदावर्तेंच्या मनमानी पद्धतीच्या निर्णयांमुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

सदावर्तेंवर काय आरोप होत आहेत?

सदावर्ते यांनी निवडणुकीत 6.5 टक्के व्याजदर देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्याच बैठकीत त्यांनी मनमानी पद्धतीने काही निर्णय घेतले. यात ठेवींवरील व्याजदरापेश्रा कमी दराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला. यानंतरच्या काळातही त्यांनी मनमानी पद्धतीने अनेक निर्णय घेतले. यात बँकेचे सभासद नसतानाही तज्ञ संचालक म्हणून स्वतःची आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटलांची नियुक्ती करवून घेतली. कोणताही अनुभव नसलेल्या 22 वर्षांच्या सौरभ पाटील या मेहुण्याची व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती केली. त्याला सव्वा लाख रुपयांचे मानधन, बँकेची गाडी आणि बंगला या सगळ्या गोष्टी दिल्या. कर्ज घेण्यासाठी दोन जामिनदारांची अट काढून टाकण्यात आली. नियम डावलून बँकेत 37 जणांची भर्ती केली.

हे सर्व निर्णय कोणताही दूरगामी विचार न करता किंवा रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत न करता घाईघाईने घेण्यात आले. व्याजावरील कर्ज कमी करताना बँकेचे उत्पन्न वाढण्याबाबत कोणताही विचार केला नाही. त्यामध्ये इतर खर्च कमी करून असा निर्णय घ्यायला हवा होता. यात वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी अनावश्यक शाखा आणि विस्तार केंद्र कमी करणे, डिजिटल व्यवहार प्रणाली लागू करत बँकेच्या सदस्यांसाठी क्रेडिट आणि डेबिट कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. पण तसे करण्यात आले नाही.

Uday Samant : ठाकरेंचं चॅलेंज सामंतांनी स्वीकारलं! म्हणाले, शिंदेच कशाला आम्ही 50 आमदार..

याशिवाय शासकीय कार्यालये, बँका अशा ठिकाणी कोणाचे फोटो लावायचे याचे निकष राज्य सरकारच्या कार्मिक विभागाने घालून दिले आहे. यात महापुरुषांशिवाय राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो असले पाहिजेत अशी तरतूद आहे. वेगळ्या विचारधारेला मानणाऱ्या सभासदावर त्याचा परिणाम होऊन बँकेपासून काही खातेदार व ठेवीदार बाजूला जात असतात. यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. पण, बँकेत सत्ता येताच सदावर्तेंनी स्वतःचे फोटो लावून घेतले. बँकेच्या प्रवेशद्वारावर हे फोटो दिसू लागले.

सदावर्तेंच्या याच मनमानीला कंटाळून महाव्यवस्थापकांनी राजीनामा दिला होता. स्वतः रिझर्व्ह बँकेने बँकेतल्या ठरावांबाबत चिंता व्यक्त करणे सुरु केले. मृत खात्यांबाबत कोणताही खुलासा वेळेत आणि समाधानकारक न दिल्याने एसटी बँकेला तब्बल दोन लाखांचा दंड ठोठावला. 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दंड ठोठावण्यात आला. या सगळ्यामुळे सभासदांमध्येही असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले अन् बँकेतील 2300 कोटींच्या ठेवींपैकी तब्बल 500 कोटींच्या ठेवी सभासदांनी काढून घेतल्या.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेच्या सीडी रेषोची मर्यादा 72 टक्के असते. पण तो कालपर्यंत 96 टक्के झाला आहे. परिमाणी बँकेवर बंधने आली. तीन महिन्यांपासून कर्जाचे वाटप बंद आहे. याचमुळे संचालकही सदावर्तेंच्या विरोधात गेले. संदीप शिंदे म्हणाले, सभासद हवालदिल झाले आहेत. सदावर्तेच्या हेकेखोर वृत्तीला संचालकही वैतागून सवतासुभा करण्याच्या मनःस्थितीत दिसून येत आहेत. एकूणच नंबर एकच्या बॅंकेचं सदावर्तेंसारख्या नेतृत्वाने वाटोळे केले याचे दुःख आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. एकूणच काय तर, संचालक विरोधात, गंभीर आरोप अन् चौकशींचे आदेश.. या सगळ्या गोष्टींमुळे सदावर्ते चांगलेच अडचणीत आले आहेत, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube