मुंबईतील पायधूनी परिसरात विषबाधेमुळे आई-वडील आणि दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू, फूड पॉयझनिंगचा संशय
मुंबईतून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून, विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Death of parents and two minor daughters : मुंबईतून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून, विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईतील पायधुनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये घडली आहे. मृतांमध्ये 40 वर्षीय अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी 35 वर्षीय नसरीन डोकाडीया आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुली, 16 वर्षोय आयशा आणि 13 वर्षोय झैनब यांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसर, संबंधित कुटुंबाने शनिवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या काही नातेवाईकांसोबत जेवण केले होते. या जेवणामध्ये बिर्याणीचा समावेश होता. जेवणानंतर काही वेळातच त्यांनी कलिंगड देखील खाल्ल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळपासून कुटुंबातील सर्वांना अचानक उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि चक्कर येणे अशी गंभीर लक्षणे जाणवू लागली.
प्रकृती बिघडत असल्याने कुटुंबीयांनी प्रथम स्थानिक फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला. डोक्टरांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, रविवारी सर्वांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सर्वप्रथम एका मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांत दुसऱ्या मुलीने देखील प्राण गमावले. मुलींच्या मृत्यूनंतर काही वेळातच आई-वडिलांचा देखील मृत्यू झाला, ज्यामुळे ही घटना अधिकच वेदनादायक ठरली.
बच्चू कडूंच्या उमेदवारीवर मोठा पेच; शिवसेनेशी संबंध काय? असा सवाल, प्रहार जनशक्ती पक्ष विलीन करण्याची अट?
या घटनेपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले होते की, त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तथापि, नेमकं कोणत्या अन्नपदार्थामुळे ही विषबाधा झाली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, संबंधित अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. एका रात्रीत संपूर्ण कुटुंब संपुष्टात आल्याने स्थानिक नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत. या प्रकरणामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.