मराठी-हिंदी वादावर प्रश्न करताच अजित पवार संतापले; राज ठाकरेंच नाव न घेता लगावला टोला

Ajit Pawar on Marathi-Hindi Controversy : राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरु आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Marathi-Hindi) सध्या राज्यात हिंदीवरुन टिकाटिप्पणी सुरु झाली आहे, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर अजित पवार चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
अभिजात भाषेचा दर्जा
सध्या कोणाला उद्योग नाहीय. मराठी आपली मातृभाषा आहे. त्याबद्ल कोणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा असते, त्याबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते. मातृभाषा टिकली पाहिजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला. खूप वर्ष दिल्लीत हे प्रकरण पडून होतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच धाडस कोणी दाखवलं नाही. ते एनडीएन आणि मोदी साहेबांनी केलं असं अजित पवार म्हणाले.
Raj Thackeray : हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही; राज ठाकरेंचा थेट इशारा
मराठी भाषा भवन मरीन ड्राइव्हला उभारण्यात येणार आहे. त्याचा प्लान तयार आहे. निधीची कुठलीही कमतरता जाणवणार नाही. जगात सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलली जाते. तुमच्या आमच्या कोणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात रहायचं असेल, तर मराठी बोलता आलच पाहिजे. भारतात अनेक राज्यात हिंदी भाषा बोलली जाते असंही ते म्हणाले.
काही लोक म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा आहे. त्याच्यावर वाद आहे. पण मला त्या वादात शिरायच नाही. सध्या कोणाला उद्योग नाहीयत, काम नाहीयत. त्यामुळे ते अशा गोष्टींमध्ये वेळ घालवत आहेत असं म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला आहे. तसंच, इंग्रजी ही जगातील बहुतेक देशात चालते. त्यामुळे ती पण भाषा आली पाहिजे. तिन्ही भाषांना महत्त्व आहे. पण मातृभाषेला नंबर एकच स्थान आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.
विरोधकांकडे मुद्दा नाही
संघाला हिंदी राष्ट्र बनवायच आहे, यावर अजित पवार म्हणाले की, आज समोरच्या राजकीय पक्षांना मुद्दा राहिलेला नाही. आज खरतर उन्हाची तीव्रता आहे. उष्माघात आहे. तापमान वाढतय. बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतेय. यंदा 103 ते 105 टक्के पाऊस कोसळले, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे, पण तो पाऊस पडला पाहिजे असं म्हणज अजित पवारांनी वरील प्रश्नावर वेळ मारून नेली.