‘आदित्य ठाकरेंचा दुरान्वयेही संबंध नाही’; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut on Disha Salian Case दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरेंचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला.
Sanjay Raut on Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचेही नाव असल्याचा दावा केला जात आहे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भुमिका मांडली.
काय म्हणाले राऊत
हा अत्यंत संवेदनशील विषय असून, एका मुलीच्या चारित्र्याशी आणि तिच्या कुटुंबावर झालेल्या आघाताशी संबंधित असल्याचं राऊत यांनी म्हटलं. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी अनेकदा तपास केला असून, त्यांच्या तपासाच्या निष्पक्षतेवर शंका घेता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचं राऊतांचं म्हणणं
संजय राऊत यांनी सांगितलं की, राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांचं सरकार नसून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांच्या कार्यकाळात दिशा सालियन प्रकरणाचा तपास पूर्ण करून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. या तपासात आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झाल्याचा दावा राऊत यांनी केला.
भाग्यश्रींची गणपती आरती अन् वाद पेटला; पटवर्धन घराण्यात उत्तराधिकारीपदावरून संघर्ष?
विरोधकांचं सरकार असतानाही मुंबई पोलिसांनी विविध आरोपांच्या दिशेने तपास केला. मात्र, आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध असल्याचा पुरावा तपासात आढळला नाही, असं राऊत म्हणाले.
‘ठाकरे कुटुंबाला डाग लावण्याचा प्रयत्न’
या प्रकरणाची वारंवार राजकीय चर्चा करून दिशा सालियन आणि त्यांच्या कुटुंबाच्या बदनामीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हा विषय आता राजकीय आखाडा बनला असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही, असं त्यांनी म्हटलं.
न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही आरोपी समजू नये, असं स्पष्ट केल्याचा उल्लेख करत राऊत यांनी काही माध्यमांकडून संशय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्यासाठी राजकीय कारस्थान सुरू असल्याचं सांगत, या मोहिमेविरोधात लढत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना कुणाची? आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी; शिंदे गट बाजू मांडणार
एफआयआरच्या पानांवरून राऊतांचा गंभीर आरोप
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणातील एफआयआरमधील काही पाने समोर आल्यावरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. 16 पानांच्या एफआयआरमधील केवळ एकच पान बाहेर कसं आलं, असा सवाल त्यांनी केला.
सह्याद्री विश्रामगृहावर झालेल्या बैठकीनंतर एफआयआरमधील ही पाने तयार करण्यात आली आणि त्यानंतर ती बाहेर आल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. त्या बैठकीनंतर दोन नेते एकाच गाडीतून एशियाटीक लायब्ररीकडे गेल्याचाही दावा त्यांनी केला. या बैठकीत आणि प्रवासादरम्यान झालेल्या चर्चेनंतर एफआयआरची पाने लिहिली गेल्याचं राऊत यांनी म्हटलं.
मोठी बातमी! परवानगी नाकारली तरी, जरांगे आज मुंबईकडे कूच करणार
आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप
आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर सरकारविरोधात आवाज उठवत असल्याने त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. महापालिकांमधील विविध प्रकरणे आदित्य ठाकरे समोर आणत असल्याने त्यांना थांबवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं.