Eknath Shinde : ‘पंचामृत’ बजेटमधील प्रथम अमृत शेतकऱ्यांसाठीच!

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी राज्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही राज्याचे ‘पंचामृत’ बजेट मांडले. या ‘पंचामृत’मधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठी आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रति शेतकऱ्यांना १८०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकार त्यात आणखी सहा हजार रुपये देत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी दहा हजार रुपये देखील दिले जात आहेत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर येथे केला.
अहमदनगर येथील महापशुधन एक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते.
Shinde Vs Thackeray मालेगाव सभेआधी ठाकरेंना धक्का! – Letsupp
एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकरी हा राज्याचा केंद्रबिंदू आहे. आमचं सरकार हे देखील शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. म्हणूनच आज अहमदनगर येथे महापशुधन एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. आपल्या पशुधनावर मध्यंतरी लंपी आजाराचे सावट आले होते. मात्र, त्यावर तातडीने राज्यातील शेतकऱ्यांना लस उपलब्ध करुन देण्यात आली. राज्य सरकार हे कायम शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे.
राज्य सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. आम्ही सादर केलेल्या बजेटमध्ये शाश्वत शेतीला प्राधान्य दिले आहे. या पंचामृत बजेटमधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठीच आहे. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.