अजितदादांच्या ‘अर्थ’ खात्यावर राहणार शिंदेंच्या शिवसेनेचा वॉच; एकनाथ शिंदेंचे आमदारांना आदेश?

Eknath Shinde : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गळतीने महाविकास आघाडी (MVA) जर्जर झाली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतही सारेच आलबेल आहे असे नाही. अजित पवारांच्या (Ajit Pawar) अर्थखात्यावर एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेचा वॉच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना तसा आदेशच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शिवसेनेतील मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्वतः एकनाथ शिंदे हजर होते. उपस्थित मंत्र्यांनी निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित करत अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली. यानंतर अजित पवारांच्या अर्थ खात्यावर बारकाईने नजर ठेवा असे आदेश शिंदे यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
अजित पवार यांच्या खात्यात सध्या 1400-1400 कोटी रुपयांचे दोन निधी आहेत. या निधीवर प्रामुख्याने लक्ष ठेवले पाहिजे. हा निधी नेमका कुठे वितरीत होत आहे याची माहिती आपल्याकडे असायला हवी असे आग्रही मत या बैठकीत मांडण्यात आले. आपल्या हक्काचा जो निधी आहे तो मिळालाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत घेतल्याची माहिती आहे.
Hindi Language Compulsary : हिंदी भाषेची सक्ती नको पण..,; शरद पवारांनी मौन सोडलं…
महाविकास आघाडीचे सरकार असताना या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळीही अर्थ खाते अजित पवार यांच्याकडेच होते. तेव्हाही अजित पवार निधीवाटपात दुजाभाव करत असल्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांकडून केली जात होती. त्यानंतर ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे आमदारांचा एक गट घेऊन पक्षातून बाहेर पडले. त्यावेळीही त्यांनी हेच कारण दिले होते.
त्यानंतर दीड वर्षांनंतर अजित पवार स्वतःच महायुतीत सहभागी झाले. महायुतीतही त्यांनी तिजोरीच्या चाव्या मिळवल्या. उपमुख्यमंत्रिपद आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपदही मिळवलं. आता महाविकास आघाडीचाच कित्ता महायुतीतही गिरवला जाऊ लागला आहे. निधीवाटपात दुजाभाव होत असल्याची तक्रार शिंदे गटातील मंत्री अनेक दिवसांपासून करत आहेत. या तक्रारीत काही तथ्य नाही असा दावा अजित पवारांनीही केला होता.
परंतु, आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता तर एकनाथ शिंदेंनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. थेट अर्थ खात्यावरच नजर ठेवण्याचे आदेश त्यांनी आपले आमदार आणि मंत्र्यांना दिला आहे. आता शिंदे यांचे आमदार आणि मंत्री खरंच अर्थखात्यावर वॉच ठेऊन अजितदादांशी पंगा घेणार का ? अजित पवार या प्रकाराला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
बच्चू कडूंना दिलासा! अमरावती बँक अध्यक्षपद अपात्रतेच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती